Viral Video : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ हे शहर आपल्या 'नवाबगिरी'साठी ओळखले जाते. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने या 'अभिजात' वर्गाच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका महिलेने ऑनलाइन पोर्टर (Porter) बुक करून चक्क घरातील कचरा फेकण्यासाठी रायडरचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकी घटना काय? महिलेची विचित्र 'डिलिव्हरी'
एका महिलेने नेहमीप्रमाणे तिचे सामान पाठवण्यासाठी पोर्टर ॲपवरून रायडर बुक केला. रायडर घरी पोहोचल्यावर त्याने पेमेंटबद्दल विचारले असता, महिलेने "मी ऑनलाइन पैसे दिले आहेत," असे सांगून पार्सल त्याच्या स्वाधीन केले. रायडरला वाटले की यात काही महत्त्वाचे सामान असेल, जे ठराविक पत्त्यावर पोहोचवायचे आहे. मात्र, खरी गंमत पुढेच होती.
"कोणालाही देऊ नका, फक्त फेकून द्या!"; रायडरला बसला धक्का
जेव्हा रायडर डिलिव्हरीच्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा तिथे पार्सल स्वीकारण्यासाठी कोणीही नव्हते. त्याने संबंधित महिलेला फोन करून विचारले, "मॅडम, हे पार्सल कोणाला द्यायचे आहे?" त्यावर महिलेने दिलेले उत्तर ऐकून रायडर चक्रावून गेला. ती म्हणाली, "भाऊ, तुम्हाला ते कोणालाही देण्याची गरज नाही, ते फक्त कोठेतरी फेकून द्या." पोर्टरमध्ये घरगुती कचरा असल्याचे समजताच रायडरला स्वतःच्या कामाचा अपमान झाल्याचे जाणवले.
हेही वाचा - MRP Violation: 20 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे आकारले...; रेस्टॉरंटला मोठा भुर्दंड, ग्राहक आयोगाची कारवाई
रायडरने बनवला व्हिडिओ; सोशल मीडियावर संताप
अपमानित झालेल्या रायडरने या घटनेचा व्हिडिओ बनवला. तो म्हणाला, "मी पोर्टर यासाठी चालवत आहे का, की लोकांनी माझ्याकडून त्यांचा कचरा फेकून घ्यावा?" या व्हिडिओचा दुसरा भागही समोर आला असून, लोकांच्या विनंतीवरून रायडर 7 किलोमीटर पुन्हा प्रवास करून तो कचरा शोधायला गेला, पण तो सापडला नाही. त्याने कचरा रस्त्याच्या कडेला फेकल्याबद्दल माफीही मागितली.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर (@karannishadd1) या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत 8.1 दशलक्षाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, नेटिझन्सनी महिलेच्या या वागण्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "पैसे दिले म्हणजे कोणालाही नोकर समजून वागवणे चुकीचे आहे," अशा आशयाच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.