सध्या मान्सून भारतात दाखल झाला आहे. अनेक राज्यात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली. देशात मुसळधार पाऊस सुरू असल्याने डोंगराळ भागातील रस्ते खचले असून डोंगराळ भागात पावसाळ्यात प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. अशातच अरुणाचल प्रदेश येथील अंगावर काटा आणणारा एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. सध्या संपूर्ण ईशान्य भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे, अशातच 28 जून रोजी अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यातील सिजी येथे अचानक झालेल्या भूस्खलनाच्या तडाख्यात एका बाईकस्वाराचा जीव थोडक्यात बचावला.
जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे अरुणाचल येथील डोंगरराळ भागातील डोंगराचा मोठा भाग क्षणात कोसळताना दिसला, यावेळी एक बाईकस्वार देखील तिथे उपस्थित होता. डोंगरावरील माती कोसळू लागल्यामुळे तरुण आपल्या बाईकसह थेट खाली वाहणाऱ्या नदीच्या दिशेने फेकला गेला. तो तरुण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याच्या पायांखालची जमीन सरकली.
काही सेकंदांतच तो तरुण मोठ्या माती आणि दगडांच्या ढिगाऱ्यासह खोल दरीत कोसळला. यावेळी त्या तरुणाचा जीव वाचणे कठीण झाले होते मात्र नशीब बलवत्तर म्हणून तो सुखरूप बाहेर पडला. एवढचं नव्हे तर एवढ्या भयानक भूस्खलनादरम्यान तरुणाला किरकोळ दुखापत देखील झाली नाही. हे भूस्खलन इतके भीषण होते की, डोंगराचा संपूर्ण राडारोडा थेट खाली असलेल्या सिजी नदीत पडला. अरुणाचल प्रदेशात मोठ्या भूस्खलनातून हा तरुण चमत्कारिकरित्या बचावल्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
तसेच अरुणाचल प्रदेशात मोसमी पावसामुळे मुसळधार पाऊस पडत असून ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील रस्ते आणि महामार्गासारख्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. विविध राष्ट्रीय आणि राज्य संस्थांकडून बचावकार्य सुरू आहे. त्यासाठी हत्तींचाही वापर केला जात आहे. राज्यात गेल्या सात दिवसांमध्ये किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अरुणाचल प्रदेशात पुराचा फटका बसलेल्या नऊ रस्त्यांपैकी केवळ दोनच पुन्हा सुरू करण्यात आले आहे. उर्वरित सात रस्ते बंद आहेत किंवा वाहतुकीसाठी सुरक्षित नाहीत. पापुम परे जिल्ह्यात ढगफुटी होऊन होज-पोतिन मार्ग बंद पडला. त्यामुळे या भागाचे शेजारच्या अनेक जिल्ह्यांशी असलेला संपर्क तुटला आहे.