Ragging Death Case: हिमाचल प्रदेशातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा रॅगिंग आणि नको त्या कृत्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका प्राध्यापकासह 3 वरिष्ठ विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पीडित विद्यार्थिनीचा 26 डिसेंबर रोजी लुधियाना येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तक्रारीनुसार, मृत विद्यार्थिनी पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर 2025 रोजी हर्षिता, आकृती आणि कोमोलिका या तीन वरिष्ठ विद्यार्थिनींनी त्यांच्या मुलीला बेदम मारहाण केली आणि धमकावले. तसेच, महाविद्यालयाचे प्राध्यापक अशोक कुमार यांनी मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप वडिलांनी केला आहे.
मृत्यू आधीचा व्हिडिओ व्हायरल
या प्रकरणाला तेव्हा गती मिळाली जेव्हा पीडित विद्यार्थिनीने मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तिने प्राध्यापकावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. प्राध्यापकाच्या वर्तनाचा निषेध केला असता, त्याने आपल्याला मानसिक त्रास दिला आणि धमकावले, असे पीडितेने या व्हिडिओत म्हटले आहे. दरम्यान, मारहाण आणि अत्याचारामुळे विद्यार्थिनी तीव्र मानसिक धक्क्यात होती, ज्यामुळे तिची प्रकृती खालावली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. मुलगी गंभीर अवस्थेत असल्याने आणि कुटुंबावर ओढवलेल्या संकटामुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे वडिलांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थिनीने 2024 मध्ये प्रवेश घेतला होता. 21 ऑगस्ट 2025 रोजी तिचे नाव नोंदणीतून वगळण्यात आले होते, मात्र सप्टेंबरमध्ये ती पुन्हा प्रवेशासाठी गेली असताना ही घटना घडली.
हेही वाचा – CBI Gold Bribery Case : 'ते 70 लाख सोन्यात बदला…'; फोन टॅप झाला अन् लेडी ऑफिसरला CBI ने गाठलं
पोलिसांची कारवाई आणि कलमे
कांगडाचे पोलीस अधीक्षक (SP) अशोक रतन यांनी सांगितले की, या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 75 अत्याचार, कलम 115(2) स्वेच्छेने दुखापत करणे, कलम 3(5) सामूहिक उद्देश या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, आरोपी प्राध्यापक अशोक कुमार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. काही शिक्षकांनीही प्राध्यापकाचे समर्थन केले असून, पीडित विद्यार्थिनी या सत्रात त्यांची विद्यार्थिनी नव्हती, असा दावा केला आहे. पोलीस सध्या वैद्यकीय अहवाल, व्हिडिओ पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासत आहेत.