GAGAN Navigation System: भारतीय विमान वाहतुकीत नवा इतिहास; रेडिओ सिग्नलविना इंडिगो विमानाचे ‘गगन’ प्रणालीच्या मदतीने यशस्वी लँडिंग

'डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन'च्या (DGCA) थेट देखरेखीखाली इंडिगो एअरलाईन्सच्या 'एअरबस A320' या विमानाने उदयपूर विमानतळाच्या रनवेवर एक ऐतिहासिक लँडिंग केले.

GAGAN Navigation System: भारतीय विमान वाहतुकीत नवा इतिहास; रेडिओ सिग्नलविना इंडिगो विमानाचे ‘गगन’ प्रणालीच्या मदतीने यशस्वी लँडिंग

GAGAN Navigation System:  भारतीय नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासात 27 जून 2026 च्या दुपारी एका सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारख्या पर्वाची सुरुवात झाली. 'डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन'च्या (DGCA) थेट देखरेखीखाली इंडिगो एअरलाईन्सच्या 'एअरबस A320' या विमानाने उदयपूर विमानतळाच्या रनवेवर एक ऐतिहासिक लँडिंग केले. वरकरणी हे लँडिंग नेहमीसारखे वाटत असले, तरी या विमानाने जमिनीवरील पारंपारिक रेडिओ सिग्नलचा वापर न करता, थेट अंतराळात फिरणाऱ्या भारताच्या स्वदेशी उपग्रहांच्या मार्गदर्शनाने सुरक्षित लँडिंग करून इतिहास रचला. भारताच्या मुख्य हवाई मार्गांवर धावणाऱ्या एखाद्या मोठ्या व्यावसायिक प्रवासी जेटने या अत्याधुनिक उपग्रह-आधारित प्रणालीचा वापर करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

इस्रो आणि एएआयची कमाल; काय आहे 'GAGAN' यंत्रणा?
'गगन' (GPS Aided GEO Augmented Navigation) ही प्रणाली भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि 'एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया' (AAI) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. ही यंत्रणा इस्रोच्या 'GSAT-8' आणि 'GSAT-10' या दळणवळण उपग्रहांच्या साहाय्याने काम करते. अमेरिकेच्या सामान्य GPS पेक्षा ही यंत्रणा वेगळी असून ती एखाद्या 'स्मार्ट इन्स्पेक्टर'प्रमाणे कार्य करते. विमानाला धावपट्टीवर अचूकपणे उतरवण्यासाठी केवळ मोबाईलमधील GPS पुरेसे नसते, कारण पृथ्वीच्या वरच्या वातावरणातून (आयनोस्फिअर) येताना हे सिग्नल्स थोडे विचलित होतात. 'गगन' प्रणाली नेमकी हीच त्रुटी ओळखून त्यात सुधारणा करते आणि विमानाला अगदी अचूक मार्ग दाखवते.

कमी खर्चात '3D' मार्ग; विमानतळांना मिळणार मोठा फायदा
उदयपूरमध्ये करण्यात आलेल्या या लँडिंगला तांत्रिक भाषेत 'लोकलायझर परफॉर्मन्स विथ व्हर्टिकल गाइडन्स' (LPV) म्हटले जाते. हे तंत्रज्ञान वैमानिकाला डावी-उजवी आणि वर-खाली अशा दोन्ही दिशांनी अचूक '3D मार्ग' दाखवते.

मोठ्या विमानतळांवर यासाठी कोट्यवधी रुपयांची 'इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम' (ILS) जमिनीवर बसवावी लागते. परंतु, 'गगन'मुळे जमिनीवर कोणताही महागडा खर्च न करता केवळ अंतराळातील उपग्रहांच्या मदतीने हे काम अगदी सहज होते. भारतातील प्रत्येक लहान शहरात महागडी ILS उपकरणे बसवणे शक्य नाही, अशा ठिकाणी 'गगन' तंत्रज्ञान अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा – China Infiltration : चीनने अरुणाचल प्रदेशात थेट रस्ते आणि लष्करी छावण्या उभारल्या? स्थानिक नागरिकांचे म्हणणे काय

'उडान' योजनेला बळ आणि जागतिक पातळीवर भारताचा दबदबा
केंद्र सरकारच्या 'उडान' (UDAN) योजनेअंतर्गत देशातील दुर्गम आणि लहान शहरांमध्ये विमानसेवा वेगाने विस्तारत आहे. अशा प्रादेशिक विमानतळांसाठी 'गगन' प्रणाली वरदान ठरणार आहे. यामुळे खराब हवामान किंवा कमी दृश्यमानतेमुळे उड्डाणे रद्द होण्याची डोकेदुखी थांबेल, पर्यायाने इंधनाची बचत होईल आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल. या यशस्वी चाचणीमुळे अशा प्रकारचे स्वदेशी तंत्रज्ञान वापरणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताने स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या विषुववृत्तीय आकाशात अशी क्षमता सिद्ध करणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number