बॉलिवूडसह जागतिक स्तरावर आपल्या सुरेल संगीताने जादू करणारे प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखण्याची तक्रार केल्यामुळे त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ए. आर. रहमान घरी असताना छातीत तीव्र वेदना जाणवल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून अधिकृत वैद्यकीय बुलेटिनची प्रतीक्षा आहे. रहमान यांची प्रकृती बिघडल्याची बातमी समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर त्यांच्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
ए. आर. रहमान यांना संगीतविश्वात एक प्रतिष्ठित स्थान मिळवण्यास अपार मेहनत आणि संघर्ष करावा लागला. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे आर. के. शेखर हे प्रसिद्ध संगीतकार होते. वडिलांच्या निधनानंतर रहमान यांनी आपल्या कौशल्यावर भर देत संगीत क्षेत्रात पदार्पण केले.
हेही वाचा: मृत घोषित केलेलं बाळ टिचकीवर जिवंत! नंदुरबारमध्ये चमत्कारीत घटना
लहान वयातच पियानो वाजवण्याची सुरुवात करणाऱ्या रहमान यांनी संगीताचे विविध पैलू आत्मसात केले. त्यांची खरी ओळख झाली 1992 साली प्रदर्शित झालेल्या मणिरत्नम यांच्या ‘रोजा’ चित्रपटामुळे. या चित्रपटातील अप्रतिम संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ‘रंगीला’, ‘दिल से’, ‘ताल’, ‘लगान’, ‘रंग दे बसंती’, ‘रॉकस्टार’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले.ए. आर. रहमान यांना केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. 2009 मध्ये ‘स्लमडॉग मिलियनेअर’ या चित्रपटातील संगीतासाठी त्यांनी ऑस्कर पुरस्कार जिंकला. याशिवाय ग्रॅमी, गोल्डन ग्लोब, पद्मभूषण यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
सध्या रहमान यांच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी चाहत्यांकडून सतत प्रार्थना केली जात आहे. त्यांच्या संगीतामुळे जगभरात करोडो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान कलाकाराच्या तब्येतीत लवकर सुधारणा होवो, अशीच इच्छा सर्वजण व्यक्त करत आहेत.