Tamil Nadu Elections 2026: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतदावादरम्यान आज एक प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. राज्याचे माजी मंत्री डॉ. एच. व्ही. हांडे यांनी वयाच्या 99 व्या वर्षी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. केवळ मतदान करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासीयांना लोकशाही बळकट करण्याचे आवाहनही केले. त्यांच्या या उत्साहाची आणि कर्तव्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून त्यांचे ट्विट रिट्विट करत डॉ. हांडे यांच्या जिद्दीचे कौतुक केले आहे.
1946 पासूनचा अविरत प्रवास; ‘प्रत्येक मताला महत्त्व’
डॉ. हांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत भावनिक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, “मी पहिल्यांदा मतदान 1946 मध्ये एक वैद्यकीय विद्यार्थी असताना केले होते. वयाच्या 99 व्या वर्षी, मी आपल्या राष्ट्राला स्वतःचा आवाज प्राप्त करताना पाहिले आहे आणि आज मी पुन्हा एकदा माझ्या आवाजाचा (मताचा) वापर केला.” मतदान हा केवळ अधिकार नसून ती आपल्या भविष्याप्रती असलेली मोठी जबाबदारी आहे, असा संदेश त्यांनी तरुण पिढीला दिला.
At the age of 99, I have seen our nation earn its voice – and today, I used mine. The first time I voted was in 1946 as a Medical Student.
Voting is not just a right, it is a responsibility to the future we leave behind.
Your one vote matters. Step out. Stand up. Be counted. pic.twitter.com/AaAcePQRX6 — Dr. H. V. Hande (@DrHVHande1) April 23, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संदेशाचे स्वागत
डॉ. हांडे यांच्या या पोस्टने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही पोस्ट रिट्विट करताना लिहिले की, “हा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे! मला आशा आहे की, डॉ. हांडे यांच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही सर्वाधिक संख्येने मतदान कराल आणि आपली लोकशाही अधिक बळकट कराल.” लोकशाहीच्या या उत्सवात ज्येष्ठ नागरिकांचा असा सहभाग तरुणांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
একটি অত্যন্ত গুরুত্বপূর্ণ বার্তা! আমি আশা করি সর্বোচ্চ সংখ্যক তরুণ ভোট দিয়ে আমাদের গণতন্ত্রকে শক্তিশালী করবে। https://t.co/B937lbw7FQ — Narendra Modi (@narendramodi) April 23, 2026
तमिळनाडूत मतदानाचा उत्साह
आज तमिळनाडू विधानसभेसाठी सर्व 234 जागांवर मतदान पार पडले. एकीकडे सुपरस्टार्सनी रांगा लावल्या असतानाच, दुसरीकडे डॉ. हांडे यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधींनी दाखवलेला उत्साह या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरला. “बाहेर पडा आणि मतदान करा,” असे आवाहन डॉ. हांडे यांनी केल्यामुळे मतदान केंद्रांवर दुपारीही मतदारांचा ओघ कायम असल्याचे पाहायला मिळाले.
लोकशाहीची प्रतिष्ठा आणि जबाबदारी
डॉ. हांडे यांनी आपल्या संदेशाद्वारे मतदारांना प्रोत्साहित केले. वयाची शंभरी जवळ असतानाही त्यांनी दाखवलेली ही तत्परता लोकशाहीच्या प्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक मानली जात आहे. त्यांच्या या कृतीमुळे तमिळनाडू निवडणुकीत एका नव्या ऊर्जेचा संचार झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.