Apple India Fine : प्रसिद्ध अमेरिकन टेक कंपनी 'अॅपल' (Apple) सध्या भारतात मोठ्या कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) अॅपलला अविश्वास नियमांचे (Antitrust laws) उल्लंघन केल्याप्रकरणी अंतिम इशारा दिला आहे. जर कंपनीने विहित मुदतीत उत्तर दिले नाही, तर अॅपलला त्यांच्या जागतिक उलाढालीवर आधारित सुमारे 38 अब्ज डॉलर म्हणजेच तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
काय आहे नेमके प्रकरण?
अॅपलवर आपल्या आयफोन आणि आयपॅडच्या 'iOS अॅप स्टोअर'वर वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. 2022 पासून सुरू असलेल्या या प्रकरणात अनेक भारतीय स्टार्टअप्सनी अॅपलच्या मक्तेदारीविरुद्ध तक्रार केली होती. अॅपल आपल्या प्लॅटफॉर्मवर अॅप डेव्हलपर्सकडून 15 ते 30 टक्के इतके भरमसाठ कमिशन आकारते. तसेच, डेव्हलपर्सना त्यांच्या अॅप्समध्ये बाह्य पेमेंट लिंक्स देण्यास मज्जाव केला जातो, ज्यामुळे लहान स्टार्टअप्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे सीसीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
तपासातील निष्कर्ष आणि विलंब
2024 मध्ये झालेल्या चौकशीत अॅपलने आपल्या बाजारपेठेतील स्थानाचा गैरवापर केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. सीसीआयने ऑक्टोबर 2024 पासून अॅपलकडे वारंवार स्पष्टीकरण मागितले होते, परंतु कंपनीकडून प्रतिसाद देण्यास विलंब झाला. आता आयोगाने स्पष्ट केले आहे की, प्रतिसादासाठी यापुढे अधिक वेळ दिला जाणार नाही. अॅपलला पुढील आठवड्यापर्यंत आपले म्हणणे मांडण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.
न्यायालयीन लढा आणि पुढील सुनावणी
अॅपलने सीसीआयच्या जागतिक उलाढालीवर दंड आकारण्याच्या प्रस्तावाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कंपनीचा असा युक्तिवाद आहे की, दंड केवळ भारतातील व्यवसायावर आधारित असावा. अॅपलने हा संपूर्ण खटला थांबवण्याचाही प्रयत्न केला आहे. या प्रकरणातील महत्त्वाची सुनावणी आता 27 जानेवारी 2026 रोजी होणार असून, त्याकडे संपूर्ण तंत्रज्ञान जगाचे लक्ष लागले आहे.