सुरत: आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका मुलाने जे केलं, त्याने संपूर्ण गुजरातसह देशभरातील लोकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सुरतमधील उद्योगपती बाबूभाई जिरावाला यांनी आपल्या आईच्या स्मृतिदिनानिमित्त गावातील 290 शेतकऱ्यांचे तब्बल 90 लाख रुपयांचे कर्ज फेडून त्यांना मोठा दिलासा दिला.
आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं - बाबूभाई जिरावाला
अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील जिरा गावात ही प्रेरणादायी घटना घडली. गावाचे मूळ रहिवासी असलेले बाबूभाई जिरावाला सध्या सूरतमध्ये रिअल इस्टेट व्यवसाय करतात. त्यांच्या आईची इच्छा होती की, गावातील शेतकऱ्यांचे ओझे त्यांनी हलके करावे. आईच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी ती इच्छा पूर्ण करत गावाला आर्थिक स्वातंत्र्याचं वरदान दिलं. माझ्या आईने सांगितलं होतं की, माझे दागिने विकून गावासाठी काही चांगलं कर. आज तिची तीच इच्छा मी पूर्ण केली, असं बाबूभाई जिरावाला यांनी सांगितले.
हेही वाचा - टेलरने वेळेवर ब्लाऊज न दिल्याने महिलेने घेतली न्यायालयात धाव; शिंप्याला ठोठावण्यात आला 11,500 रुपयांचा दंड
जिरा गावात 100 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सेवा सहकारी समितीच्या नोंदींमध्ये 1990 च्या दशकात झालेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नावावर चुकीची कर्जं दाखल झाली होती. हा वाद गेली तीन दशके न्यायालयात प्रलंबित असून, त्यामुळे गावकऱ्यांना नवे कर्ज मिळत नव्हते. या परिस्थितीने व्यथित होऊन बाबूभाई यांनी भावनगर बँकेशी संपर्क साधला आणि सर्व थकबाकी रक्कम फेडण्याची तयारी दाखवली. बँकेने त्यांचा प्रस्ताव तत्काळ स्वीकारला आणि त्यांना संपूर्ण कर्जमुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत केली.
हेही वाचा - Kilauea Volcano : हवाईमध्ये किलाउआ ज्वालामुखीचा 200 वर्षांत चौथ्यांदा उद्रेक! 'दैत्याच्या शिंगांसारखे' 1500 फूट उंच लाव्हाचे दोन फव्वारे
शेतकऱ्यांना दिलं कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र
बाबूभाई आणि त्यांच्या भावाने एकूण 90 लाख रुपये बँकेकडे जमा करून 290 शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केलं. यानंतर गावात आयोजित समारंभात सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. गावभर जल्लोष झाला आणि लोकांनी बाबूभाईंचं स्वागत “गावाचा खरा पुत्र” म्हणून केलं. आज माझ्या आईची आत्मा समाधानी आहे. आम्ही तिचं स्वप्न पूर्ण केलं आणि गावाला मुक्त केलं, अशी भावना बाबूभाई यांनी व्यक्त केली. या घटनेने मानवतेचा खरा अर्थ समोर आला आहे. बाबूभाईंच्या या कृतीने गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.