US-Iran War: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या मंत्रिमंडळाला प्रशानाला गती देण्याचे, अमेरिका-इराण युद्धामुळे होणाऱ्या संभाव्य ऊर्जा व्यत्ययांसाठी तयार राहण्याचे आणि ‘विकसित भारत 2047’ या दीर्घकालीन ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याते 3 महत्त्वाचे संदेश दिले. 4 तासांहून अधिक काळ चाललेली ही बैठक अशा वेळी झाली, जेव्हा भारत पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या आर्थिक परिणामांशी झुंजत आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन आणि नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी परराष्ट्र धोरण, प्रशासकीय सुधारणा आणि महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीवर सादरीकरणे केली. मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू असताना आणि विरोधकांनी महागाई, इंधनाच्या किमती तसेच पश्चिम आशियातील संघर्षाचे अर्थव्यवस्थेवर होणारे व्यापक परिणाम या मुद्द्यांवर सरकारवर हल्ले तीव्र केले असताना, ही मंत्रिमंडळ बैठक पार पडली.
संदेश 1: वेग, पारदर्शकता आणि परिणाम
पंतप्रधान मोदींनी जलद प्रशासनासाठी आपला आग्रह पुन्हा एकदा व्यक्त केला आणि मंत्र्यांना नोकरशाहीतील दिरंगाईबद्दल इशारा दिला. चर्चेची माहिती असलेल्या लोकांच्या मते, पंतप्रधानांनी सांगितले की फायली एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर सतत फिरत राहू नयेत आणि मंत्र्यांना कार्यपद्धती सोपी करण्यास, पारदर्शकता सुनिश्चित करण्यास आणि जलद परिणाम देण्यास सांगितले. सरकारी कामात कोणताही विलंब होऊ नये यावर त्यांनी भर दिला आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते म्हणाले. मोदींनी मंत्र्यांना भूतकाळातील कामगिरीवर रेंगाळण्याऐवाजी भविष्यातील उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि काही राज्यांमध्ये रखडलेल्या केंद्रीय योजनांची जलद अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगितले.
संदेश 2: होर्मुझ सामुद्रधुनीतील संकटाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा सुरक्षा
अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेले वाढते ऊर्जा संकट हा बैठकीचा एक प्रमुख केंद्रबिंदू होता. या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपासचा तणाव वाढला आहे. हा पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडणारा एक अरुंद जलमार्ग आहे, ज्यातून जगातील सुमारे 1-पंचमांश तेल पुरवठा जातो. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हल्ले आणि या प्रदेशातील वाढत्या लष्करी कारवाईनंतर इराणने या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज वाहतुकीवर निर्बंध घालण्याची वारंवार धमकी दिली आहे. या अनिश्चिततेमुळे जागतिक तेल बाजार हादरले आहेत आणि पुरवठ्यात दीर्घकाळ व्यत्यय येण्याची भीती निर्माण झाली आहे.
बैठकीदरम्यान, कच्चे तेल, गॅस आणि खतांच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर, मोदींनी बायोगॅस आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या पर्यायी इंधन स्रोतांचा शोध घेण्याच्या गरजेवर भर दिला. भारत विशेषतः असुरक्षित आहे, कारण त्याच्या कच्च्या तेलाचा आणि LPG आयातीचा मोठा वाटा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो. याचा परिणाम देशांतर्गत आधीच दिसू लागला असून सरकारी तेल कंपन्यांनी अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर सुमारे 4 रुपयांची वाढ केली आहे. LPG च्या किमतीही वाढल्या आहेत, तर स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात होणाऱ्या विलंबाने पुरवठ्यावरील ताण आणखी वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काटकसरीच्या उपाययोजनांना चालना दिली असून आर्थिक शिस्तीचे आवाहन केले आहे.
संदेश 3: ‘विकसित भारत 2047’ हे केवळ एक घोषवाक्य नाही
पंतप्रधानांनी या बैठकीचा उपयोग करून सरकारची दीर्घकालीन विकासाची दृष्टी (व्हिजन) पुन्हा एकदा अधोरेखित केली. मोदी म्हणाले की, "विकसित भारत 2047" हे जे आवाहन करण्यात आले आहे. म्हणजेच स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताचे एका विकसित देशात रूपांतर करणे त्याकडे केवळ एक घोषवाक्य म्हणून न पाहता, एक वचनबद्धता म्हणून पाहिले पाहिजे. त्यांनी मंत्र्यांना पुढच्या पिढीसाठीच्या सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले, ज्या सुधारणा थेट लोकांचे जीवन सुधारतात. नवीन उद्दिष्टांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारने केवळ आपल्या भूतकाळातील यशावर समाधानी राहून चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिका-इराण युद्धाची सद्यस्थिती काय आहे?
जरी एक नाजूक स्वरूपाची शस्त्रसंधी (ceasefire) सध्या लागू असली, तरी अमेरिका-इराण संघर्ष मिटण्यापासून अजूनही खूप दूर आहे. प्रामुख्याने पाकिस्तानच्या मध्यस्थीने गेल्या काही आठवड्यांपासून शांतता चर्चा सुरू आहेत; परंतु काही प्रमुख कळीचे मुद्दे अजूनही अनिर्णित आहेत. विशेषतः इराणचा अणुकार्यक्रम आणि 'होर्मुझ सामुद्रधुनी'तून होणाऱ्या जहाज वाहतुकीवरील नियंत्रण हे ते मुद्दे आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील चर्चेमुळे दोन्ही बाजूंच्या भूमिकांमधील अंतर थोडे कमी झाले असले, तरी काही प्रमुख मागण्यांवर अजूनही एकमत झालेले नाही.
हेही वाचा – Petrol-Diesel Price Today: आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या की घटल्या? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक व्यवस्था अजूनही मोठ्या प्रमाणावर विस्कळीतच आहे आणि जहाज वाहतुकीचे प्रमाण अजूनही सामान्य पातळीपेक्षा खूपच कमी आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून जलमार्गातून होणारी जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात घटली असून, दररोज केवळ मर्यादित संख्येने मालवाहू आणि टँकर जहाजेच ये-जा करत आहेत. तात्काळ राजनैतिक तोडगा निघेल की नाही याबद्दल गुंतवणूकदारांना शंका असल्याने जागतिक तेल बाजारपेठांमध्ये तणाव आणि तेलाच्या किमती वाढलेल्याच आहेत.