Ahmedabad Plan Crash: गुजरातमधील अहमदाबाद शहरात गुरुवार, 12 जून रोजी दुपारी एक भीषण विमान अपघात घडला आहे. एअर इंडियाचे एआय-171 हे प्रवासी विमान टेकऑफ दरम्यान क्रॅश झाले. विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे रवाना होत असताना, टेकऑफ करताना विमान एअरपोर्टच्या जवळील इमारतीला धडकले आणि मोठ्या दुर्घटनेत परिवर्तित झाले.
या विमानात एकूण 242 प्रवासी होते आणि सर्वांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. आगीच्या भीषण ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते. स्थानिक मेघाणीनगर परिसरात हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
सुरुवातीच्या माहितीनुसार, टेकऑफ करताना विमान एअरपोर्टच्या कंपाऊंडजवळील इमारतीच्या भिंतीला धडकले. या अपघातामुळे विमानाचे तुकडे झाले आणि त्यानंतर प्रचंड स्फोट झाला. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे गुब्बारे अनेक किलोमीटर दूरपर्यंत दिसले. घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती आणि भयभीत लोक इधर-उधर पळत होते.
हेही वाचा: अहमदाबाद विमान अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी साधला नागरी उड्डाण मंत्र्यांशी संवाद; तात्काळ मदत करण्याच्या दिल्या सूचना
या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी लंडनला जात होते, अशी माहिती आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घटनेनंतर लगेच दमकल दल, पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विमानाचे एक पंख तुटून खाली पडले असून संपूर्ण विमान जळून खाक झाले आहे. त्याचबरोबर ज्या इमारतीला विमान धडकले, ती इमारतही मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहे.
अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयातील सर्व डॉक्टरांची सुट्टी रद्द करण्यात आली असून आपत्कालीन स्थितीत रुग्णांना मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले जात आहे.
हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात गुजरातच्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश
हे विमान लंडनकडे जाण्यासाठी टेकऑफ करत होते, मात्र काही तांत्रिक बिघाड अथवा पायलटच्या निर्णयांमुळे ही दुर्घटना घडली असावी, अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) आणि इतर तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे.
ही घटना केवळ गुजरातसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी एक मोठी शोकांतिका आहे. सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर होण्याची शक्यता असून पंतप्रधान कार्यालयाकडूनही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
संपूर्ण देश हळहळत आहे आणि या अपघातात मृत्यू पावलेल्या सर्व प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.