Microsoft Investment: नवी दिल्लीत आयोजित AI Impact Summit मध्ये जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी भारतासह 'ग्लोबल साउथ'साठी मोठी घोषणा केली आहे. या मेगा कार्यक्रमात गुगलचे CEO सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी 15 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केल्यानंतर, मायक्रोसॉफ्टनेही आपला मास्टर प्लॅन सादर केला आहे. मायक्रोसॉफ्टचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष ब्रॅड स्मिथ (Brad Smith) यांनी या समिट दरम्यान महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचा टप्पा जाहीर केला असून, यामुळे भारताच्या एआय मिशनला मोठी गती मिळणार आहे.
ग्लोबल साउथमध्ये 50 अब्ज डॉलर्सचा खर्च
दरम्यान, शुक्रवारी आपल्या भाषणात ब्रॅड स्मिथ यांनी जाहीर केले की, मायक्रोसॉफ्ट 'ग्लोबल साउथ' (भारत, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका) मध्ये एआय क्षेत्रात 50 अब्ज डॉलर्स (अंदाजे 4 लाख कोटी) गुंतवणार आहे. ही मोठी रक्कम 2030 पर्यंत एआय पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासावर खर्च केली जाईल. एआयचे फायदे अद्याप जागतिक स्तरावर समान प्रमाणात पोहोचलेले नाहीत, ही दरी भरून काढण्यासाठी मायक्रोसॉफ्टने हे पाऊल उचलले आहे.
हेही वाचा - Indian Origin Lawyer: अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या वकिलाने रोखलं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं टॅरिफ धोरण; त्यांच्या युक्तिवादापुढे डोनाल्ड ट्रम्प अक्षरशः ...
भारत: एआय प्रतिभेचे आणि वाढीचे प्रमुख केंद्र
मायक्रोसॉफ्टच्या मते, भारत केवळ एक मोठी बाजारपेठ नसून एआय वाढीचे प्रमुख केंद्र आहे. ब्रॅड स्मिथ यांनी नमूद केले की, भारत प्रतिभेने परिपूर्ण आहे, परंतु योग्य पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाशिवाय एआयचे पूर्ण फायदे मिळत नाहीत. कंपनी भारतातील डेटा सेंटर्स, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्थानिक एआय कौशल्य विकासावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एआय टूल्सशी जोडण्याची विशेष योजना आखण्यात आली आहे, ज्याचा थेट फायदा स्टार्टअप्सना देखील होईल.
सामान्य लोकांच्या जीवनात येणार सकारात्मक बदल
एआयचा वापर केवळ तंत्रज्ञानापुरता मर्यादित न राहता शिक्षण, आरोग्य, शेती आणि प्रशासनात लक्षणीय बदल घडवून आणण्यासाठी केला जाईल. योग्य पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणामुळे तंत्रज्ञान जनतेपर्यंत पोहोचवणे सोपे होईल. भविष्यात सरकार आणि टेक कंपन्या एकत्र येऊन एआयच्या माध्यमातून लोकांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास या समिटमध्ये व्यक्त करण्यात आला.