Air India Flight technical glitch
Edited Image
नवी दिल्ली: एअर इंडियाची साडेसाती काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा तांत्रिक समस्या आल्याचं समोर आलं आहे. हाँगकाँगहून दिल्लीला येताना पायलटला इंजिनमध्ये समस्या जाणवली. विमानतळाशी संपर्क साधल्यानंतर हे विमान हाँगकाँगला परतले. विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर एअर इंडियाचे विमान AI315 मध्येच परत आणण्यात आले. ज्या विमानात समस्या निर्माण झाली ते बोईंग 787-8 ड्रीमलाइनर होते. अलिकडेच अहमदाबादमध्ये अपघात झालेले विमान देखील बोईंग 787-8 होते. अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या सर्व विमानांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, आता एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातही समस्या आढळून आली आहे.
एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर हे वाइड-बॉडी विमान आहे, जे सहसा लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी वापरले जाते. या विमानात 2-क्लास कॉन्फिगरेशन आहे, ज्यामध्ये बिझनेस क्लासमध्ये 18 सीट्स आणि इकॉनॉमी क्लासमध्ये 238 सीट्स आहेत. तथापि, एअरलाइन गरजेनुसार त्यात बदल करू शकते.
हेही वाचा - केदारनाथ हेलिकॉप्टर अपघात प्रकरणी आर्यन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
एअर इंडियाचे 787-8 हे ड्रीमलाइनरचे बेसिक मॉडेल आहे. या विमानाला कमी इंधन लागते. हे विमान लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन केलेले आहे. प्रवाशांच्या आरामापासून ते इंधन वापरापर्यंत आणि विमानाच्या टाकीपर्यंत, सर्वकाही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन केलेले आहे. या विमानात दोन इंजिन आहेत. वजन कमी ठेवण्यासाठी, या विमानाचा 50 टक्के भाग अनेक संमिश्र साहित्यापासून बनलेला आहे. हे विमान एकाच वेळी 8500 नॉटिकल मैलांपर्यंतचे अंतर कापू शकते.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातातील 80 पीडितांचे DNA नमुने जुळले, 33 मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द
अहमदाबाद विमान अपघात -
दरम्यान, गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून रोजी एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले. टेकऑफच्या काही सेकंदातच हे विमान कोसळले. या विमानात 242 लोक होते. एअर इंडियाचे हे ड्रिमलायनर विमान लंडनला जात होते. हे विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीशी आदळले. या अपघातात विमानातील एका व्यक्तीशिवाय सर्वांचा मृत्यू झाला. तथापि, ज्या इमारतीशी विमान आदळले त्या इमारतीत उपस्थित असलेले लोकांचाही या अपघातात मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमान गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.