Air India Flights Cancellation: टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने आपल्या आंतरराष्ट्रीय विमान सेवेत मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. जून महिन्यापासून पुढील तीन महिने ही कपात लागू राहणार असून, अनेक महत्त्वाच्या शहरांकडे जाणारी विमाने स्थगित करण्यात आली आहेत. जागतिक बाजारपेठेत जेट इंधनाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि परिचालन खर्चातील वाढ यामुळे कंपनीने हा कठोर निर्णय घेतला आहे.
शिकागो, सिंगापूरसह प्रमुख शहरांची सेवा प्रभावित
एअर इंडियाने दिल्लीहून शिकागो, नेवार्क, सिंगापूर आणि शांघाय या शहरांकडे जाणारी विमाने तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केली आहेत. याव्यतिरिक्त सॅन फ्रान्सिस्को, पॅरिस आणि टोरंटो यांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानांच्या फेऱ्यांमध्येही मोठी घट करण्यात आली आहे. कंपनीने एकूण सुमारे 100 दैनंदिन फेऱ्या कमी केल्यामुळे प्रवाशांना तिकिटांच्या उपलब्धतेसाठी अडचणी येणार असून, विमान प्रवासाचे दर कडाडण्याची दाट शक्यता आहे.
जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ; खर्चाचा ताळमेळ बिघडला
विमान कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी सुमारे 40 टक्के खर्च हा इंधनावर होतो. मे 2026 मध्ये जेट इंधनाचे दर प्रति बॅरल 162 डॉलर्सवर पोहोचले आहेत, जे फेब्रुवारीमध्ये केवळ 99 डॉलर्स होते. इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय मार्ग तोट्यात गेले आहेत. एअर इंडियाचे CEO कॅम्पबेल विल्सन यांनी संकेत दिले आहेत की, जर किमती कमी झाल्या नाहीत, तर भविष्यात विमानांच्या फेऱ्यांमध्ये आणखी कपात करावी लागेल.
पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्याने आर्थिक बोजा वाढला
एअर इंडियाच्या खर्चात वाढ होण्यामागे पाकिस्तानची हवाई हद्द (Airspace) बंद असणे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. युरोप आणि अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांना आता लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे विमानांना व्हिएन्ना आणि स्टॉकहोम यांसारख्या शहरांमध्ये 'तांत्रिक थांबा' घ्यावा लागत असून, इंधन आणि कर्मचाऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सर्व परिस्थितीचा अंतिम बोजा प्रवाशांच्या खिशावर पडणार असल्याचे दिसत आहे.