राजस्थान : अलवरमधील एक अनोखा प्रसंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी खरेदी केलेली एक टाटा नेक्सॉन ईव्ही कार अचानक रस्त्याच्या मधोमध बंद पडली. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतुकीचा ताण निर्माण झाला. त्यानंतर कार मालकाने ई-रिक्शा चालकाची मदत घेतली आणि फक्त 1.5 लाख रुपये किमतीच्या ई-रिक्शाने ही महागडी ईव्ही कार दोरीने ओढत घरापर्यंत पोहोचवली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
ही घटना अलवर जिल्ह्यातील काला कुआं परिसरात घडली. व्यापारी सुभाष अग्रवाल यांनी नुकतीच नेक्सॉन ईव्ही खरेदी केली होती. शुक्रवारी त्यांच्या कारचे चार्जिंग संपल्याने ती ज्योतीराव फुले सर्कलवर थांबली. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. लोकांना त्रास होऊ लागल्याने सुभाष यांनी ई-रिक्शा बोलावली. त्यानंतर ई-रिक्शा चालकाने दोरीच्या साहाय्याने कार ओढत घरापर्यंत नेली. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. काही तासांतच तो देशभर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक लहान ई-रिक्शा मोठ्या नेक्सॉन ईव्ही कारला ओढताना दिसते आहे, आणि आजूबाजूला लोक हे पाहून थक्क झालेले दिसत आहेत.
हेही वाचा: New Financial Rules: 1 नोव्हेंबरपासून बदलले नियम: एलपीजी, बँक, जीएसटी आणि पेन्शनर्सवर थेट परिणाम
सरकार आणि वाहन कंपन्या गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहने (EVs) वापरायला प्रोत्साहित करत आहेत. नवे मॉडेल्स सतत बाजारात येत आहेत, परंतु चार्जिंग स्टेशनची कमतरता आणि चार्जिंग सुविधांचा अभाव हे अजूनही मोठे आव्हान आहे. यामुळे अनेक वेळा ईव्ही वापरणारे चालक अशा परिस्थितीत अडकतात. या घटनेने ईव्ही वाहनांच्या वास्तविक अडचणींवर प्रकाश टाकला आहे. कारचे चार्जिंग संपल्यास जवळपास कोणतीही मदत तत्काळ उपलब्ध नसते. अशा वेळी लोकांना पारंपरिक साधनांचा वापर करूनच तोडगा काढावा लागतो.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर हजारोंनी शेअर केला असून लोकांनी यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटलं “हा खरा इलेक्ट्रिक क्रांतीचा संगम आहे. एक ई-रिक्शा वाचवते ईव्हीला!” या घटनेतून स्पष्ट होतं की, भारतात ईव्ही क्रांतीचा प्रवास सुरू असला तरी चार्जिंग नेटवर्क आणि तांत्रिक सहाय्य यांची सुधारणा हा अजूनही मोठा प्रश्न आहे.
हेही वाचा: 10th, 12th Board Exam Time Table: दहावी-बारावीच्या परीक्षा कधी होणार?, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर