Brain Dead Woman Alive: खड्डे नेहमीच जीव घेतात असे म्हटले जाते, मात्र उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे जिथे एका खोल खड्ड्याने एका महिलेचा जीव वाचवला आहे. डॉक्टरांनी 'ब्रेनडेड' घोषित केलेल्या विनिता शुक्ला नावाच्या महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला खड्ड्यात जोरदार धक्का बसला आणि त्या धक्क्याने विनिता पुन्हा शुद्धीवर आल्या. विज्ञान आणि नशिबाच्या या खेळामुळे डॉक्टरही थक्क झाले असून, या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
घरात कोसळली अन् डॉक्टरांनी सोडली आशा
पिलीभीतमधील न्यायालयात काम करणाऱ्या विनिता शुक्ला 22 फेब्रुवारी रोजी घरकाम करत असताना अचानक कोसळल्या. त्यांना तातडीने बरेली येथील एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना 'ब्रेनडेड' घोषित केले. दोन दिवस उपचार केल्यानंतरही प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी आशा सोडून दिली. अखेर जड अंतःकरणाने कुटुंबाने 24 फेब्रुवारी रोजी त्यांना घरी नेण्याचा निर्णय घेतला. घरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली होती आणि नातेवाईकही जमू लागले होते.
त्या एका धक्क्याने नियती बदलली
विनीता यांना घेऊन रुग्णवाहिका बरेली-हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावरून पिलीभीतकडे येत होती. हाफिजगंज जवळ रस्त्यावर एक मोठा आणि खोल खड्डा होता. रुग्णवाहिका वेगाने जात असताना तिचे चाक या खड्ड्यात जोरात आदळले. या भीषण धक्क्याने विनीता यांच्या शरीरात हालचाल झाली. त्यांचे पती कुलदीप शुक्ला यांनी सांगितले की, धक्क्याने विनीता यांचे थांबलेले हृदय पुन्हा धडधडू लागले आणि त्या सामान्यपणे श्वास घेऊ लागल्या. हे पाहून कुटुंबाचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
हेही वाचा – Air India Express: लँडिंगवेळी एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचं चाक निखळलं; 133 प्रवाशांचा…
विज्ञानाच्या भाषेत 'कार्डियाक शॉक'?
कुटुंबाने तातडीने अंत्यसंस्काराचे नियोजन रद्द केले आणि विनीता यांना पिलीभीत येथील न्यूरोसिटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या मते, रुग्णवाहिकेला बसलेला तो जोरदार धक्का एखाद्या 'इलेक्ट्रिक शॉक' किंवा 'कार्डियाक मसाज'सारखा ठरला असावा, ज्यामुळे हृदय पुन्हा सुरू झाले. योग्य उपचारानंतर आता विनीता पूर्णपणे निरोगी असून घरी परतल्या आहेत. विनिता यांचे पती याला देवाचा चमत्कार मानत असून, एका खड्ड्याने त्यांच्या पत्नीला मृत्यूच्या दारातून परत आणले आहे.