Bomb Threat Delhi : देशाच्या राजधानीत आज सकाळी एका निनावी ई-मेलमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी थेट भारतीय संसद भवनाला (Parliament House) लक्ष करण्याचा इशारा दिला असून, त्यासोबतच दिल्लीतील 9 नामांकित शाळांमध्येही स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण शहरात ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’च्या नावाने हा धमकीचा मेल पाठवण्यात आला असून, त्यात अत्यंत प्रक्षोभक मजकूर वापरण्यात आला आहे.
दुपारी 1 वाजून 11 मिनिटांची वेळ; अफजल गुरूचा उल्लेख
मिळालेल्या माहितीनुसार, या धमकीच्या मेलमध्ये 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी संसद भवनात भीषण स्फोट घडवला जाईल, असा अल्टीमेटम देण्यात आला आहे. या मेलमध्ये दहशतवादी अफजल गुरूचा उल्लेख करण्यात आला असून, “दिल्लीला खलिस्तान बनवू” अशी धमकी देण्यात आली आहे. संसदेसोबतच दिल्लीतील 9 शाळांनाही उडवून देण्याचे आव्हान या मेलमध्ये दिल्याने पालकांमध्ये आणि प्रशासनात मोठी घबराट निर्माण झाली आहे.
शाळांमध्ये शोधमोहीम; बॉम्ब शोधक पथके तैनात
सोमवारी सकाळी धमकीचा संदेश मिळताच दिल्ली अग्निशमन दलाला (DFS) अनेक शाळांमधून मदतीसाठी फोन आले. तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब शोधक पथक (Bomb Disposal Squad) आणि श्वान पथक (Dog Squad) संबंधित शाळांमध्ये दाखल झाले आहेत. शाळांच्या परिसराची कसून तपासणी केली जात असून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कडक पहारा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व संवेदनशील ठिकाणांची नाकाबंदी केली असून तपासणी मोहीम तीव्र केली आहे.
#WATCH | Bomb threat calls were received at nine schools in Delhi. Delhi Police, fire teams, and bomb disposal squads are present at the spots. Visuals from Bal Bharti School pic.twitter.com/cQuEKvUgii — ANI (@ANI) February 9, 2026
सायबर सेलकडून आयपी ॲड्रेसचा तपास सुरू
दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ई-मेलचा उगम कुठून झाला, याचा तपास सायबर विभाग करत आहे. ज्या आयपी (IP) ॲड्रेसवरून हा मेल आला, त्याचे लोकेशन शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही कुणी खोडसाळपणे केलेली कृती आहे की मोठा दहशतवादी कट, या दिशेने तपास सुरू असून दिल्लीच्या सीमांवरही कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे.