Expensive Life in US : परदेशात, विशेषतः अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी जयपूरच्या एका तरुणाचा अनुभव डोळे उघडणारा ठरला आहे. ऍरिझोना येथे राहणाऱ्या पार्थ विजयवर्गीय या भारतीय तरुणाला केवळ 90 मिनिटांच्या हॉस्पिटल भेटीसाठी तब्बल 1.5 लाख रुपये (1800 डॉलर्स) मोजावे लागले आहेत. पार्थने सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून अमेरिकेतील आरोग्यसेवेच्या खर्चावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय घडलं?
पार्थ विजयवर्गीय हे पेशाने सिव्हिल इंजिनिअर असून ते डिजिटल कंटेंट क्रिएटरही आहेत. आइस-स्केटिंग करताना त्यांना अचानक दुखापत झाली. अमेरिकेत रुग्णवाहिकेचा खर्च परवडणारा नसल्याने, तीव्र वेदना होत असूनही त्यांनी स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठले.
बिलाचा आकडा पाहून बसला धक्का
रुग्णालयातील आपत्कालीन विभागात (ER) पार्थ केवळ दीड तास होते. उपचाराच्या 3 आठवड्यांनंतर जेव्हा बिल आले, तेव्हा ते पाहून त्यांचे डोळे पांढरे झाले:
एकूण बिल: 5,800 डॉलर्स (सुमारे 4.8 लाख रुपये).
विमा संरक्षण: 4,000 डॉलर्स विम्याद्वारे कव्हर झाले.
स्वतः दिलेली रक्कम: उर्वरित 1,800 डॉलर्स (सुमारे 1.5 लाख रुपये) त्यांना खिशातून भरावे लागले.
हेही वाचा - Elon Musk On AI: मानवजातीचे अस्तित्व धोक्यात? 'पुढील 5 वर्षांत AI माणसापेक्षाही हुशार होणार...'; एलोन मस्क यांचे खळबळजनक भाकीत
"आयुष्य बिल हातात देतं तेव्हा..."
पार्थ यांनी आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की, अमेरिकेत पगार जरी जास्त असले, तरी येथील राहणीमानाचा आणि उपचारांचा खर्चही तितकाच अवाढव्य आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, "अमेरिकेतील पगार तोपर्यंतच चांगले वाटतात, जोपर्यंत आयुष्य स्वतःचे बिल तुमच्या हातात देत नाही." अनेकांनी या निमित्ताने भारताच्या स्वस्त आणि प्रभावी आरोग्य व्यवस्थेचे कौतुक केले आहे.
नव्याने अमेरिकेत जाणाऱ्यांना मोलाचा सल्ला
कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स पूर्ण केलेल्या पार्थ यांचा पगार सध्या 'सिक्स-फिगर' मध्ये आहे. तरीही, त्यांनी परदेशात येऊ इच्छिणाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. "तुमची आर्थिक पार्श्वभूमी भक्कम असेल तरच स्थलांतराचा विचार करा, कारण इथे सुविधा असल्या तरी खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतो," असे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी आपल्याला मायदेशाची आणि भारताच्या सुलभ जीवनशैलीची आठवण येत असल्याचेही सांगितलं.