Thursday, January 22, 2026 03:29:15 AM

E-cigarette Controversy: संसदेत खळबळ! अनुराग ठाकूर यांचा TMC खासदारावर ई-सिगारेट ओढल्याचा गंभीर आरोप

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभा परिसरात तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराने प्रतिबंधित ई-सिगारेट (व्हेप) ओढल्याचा गंभीर आरोप उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.

e-cigarette controversy संसदेत खळबळ अनुराग ठाकूर यांचा tmc खासदारावर ई-सिगारेट ओढल्याचा गंभीर आरोप

E-cigarette Controversy: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांतील वाद तीव्र होत असताना गुरुवारी एक नवा वाद उद्भवला. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभा परिसरात तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराने प्रतिबंधित ई-सिगारेट (व्हेप) ओढल्याचा गंभीर आरोप उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. अनुराग ठाकूर यांनी टीएमसी खासदाराचे नाव न घेता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना विचारणा केली की, 'देशात ई-सिगारेटवर संपूर्ण बंदी असताना, एका टीएमसी खासदाराने गेल्या काही दिवसांत लोकसभेतच ई-सिगारेट ओढल्याचे दिसून आले आहे. सभागृहात असे करण्यास परवानगी आहे का?'

या आरोपांवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सभागृहात कोणत्याही प्रकारचे धूम्रपान करण्यास परवानगी देणारा नियम नाही. तसेच, अशी घटना अधिकृतरीत्या निदर्शनास आणल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

हेही वाचा - Fake Dupatta Scam: तिरुमला तिरुपती देवस्थानामध्ये बनावट रेशमी दुपट्ट्यांचा महाघोटाळा; 10 वर्षांत 54 कोटी रुपये लाटले

ई-सिगारेट म्हणजे काय?

ई-सिगारेट ही निकोटीनयुक्त द्रव पदार्थ गरम करून एरोसोल तयार करणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत. या वाफेद्वारे वापरकर्त्याला निकोटीन शरीरात घेतले जाते. पारंपरिक सिगारेटमध्ये तंबाखू जळत असला तरी ई-सिगारेटमध्ये तसे होत नाही, मात्र त्यातून मिळणारे निकोटीन व्यसन लावणारे आहे आणि वाफेमध्ये उपस्थित असलेल्या रसायनांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

हेही वाचा - Sachet–Parampara expose Amaal Mallik : 'बिग बॉस'मधून बाहेर येताच अमाल मलिकवर गंभीर आरोप; संचेत-परंपरानं थेट व्हिडिओ शेअर करत केला 'त्या' गाण्याबाबत खुलासा

भारतामध्ये ई-सिगारेटवर कडक बंदी

किशोरवयीन आणि तरुणांमध्ये ई-सिगारेटचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये देशभरात ई-सिगारेट, व्हेप, पॉड्स यांच्यावर संपूर्ण बंदी लागू केली. इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायद्यानुसार उत्पादन, विक्री, आयात, जाहिरात, वितरण सर्व काही गुन्हा ठरवण्यात आले आहे. अवैध विक्री किंवा वितरण करताना आढळल्यास दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. सरकारी यंत्रणांनी अनेक ठिकाणी जप्तीच्या मोहिमा राबवल्या आहेत. तरीही काही भागांत बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याचे अहवाल सांगतात. संसदेत ई-सिगारेट ओढल्याचा आरोप समोर आल्यानंतर हा मुद्दा आता राजकीयदृष्ट्या तापण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्षांनी कारवाईचे संकेत दिल्यानंतर पुढील पावले काय उचलली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 


सम्बन्धित सामग्री