आयफोन खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जगातील दिग्गज तंत्रज्ञान कंपनी अॅपलने आपल्या अधिकृत ऑनलाईन स्टोअरवरून आयफोनच्या विक्रीबाबत अत्यंत कडक धोरण स्वीकारले आहे. नवीन नियमांनुसार, आता एका ग्राहकाला कोणत्याही विशिष्ट आयफोन मॉडेलचे दोनपेक्षा जास्त युनिट्स खरेदी करता येणार नाहीत. सुरुवातीला हा नियम चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरपुरता मर्यादित होता. परंतु अॅपलने आता भारत आणि अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्येही ही खरेदी मर्यादा लागू केली आहे.
नवीन आणि जुन्या प्रीमियम मॉडेल्सवर खरेदीचे कडक निर्बंध
अॅपलने लागू केलेली ही नवीन मर्यादा केवळ नुकत्याच लाँच झालेल्या फ्लॅगशिप मॉडेल्सपुरती मर्यादित नाही. ग्राहक आता iPhone Duo, iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max यांसारख्या लेटेस्ट प्रीमियम फोन्ससोबतच मागील पिढीतील iPhone 17 मॉडेलचेही एकाच खात्यावरून दोनपेक्षा अधिक युनिट्स ऑर्डर करू शकणार नाहीत. अॅपल इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर जेव्हा एकाच युझरने 2 पेक्षा जास्त आयफोन खरेदी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सिस्टीमने ऑर्डर रोखून ‘एका ग्राहकाला फक्त 2 युनिट्स खरेदीची परवानगी आहे’ असा संदेश दर्शवला.
हेही वाचा – जेफ्री एपस्टिनसोबत केंद्रीय मंत्र्यांचा फोटो कशासाठी? राऊतांचा खळबळजनक सवाल
अमेरिकेतही नियम लागू; काळाबाजार रोखण्यासाठी अॅपलची विशेष रणनीती
भारताप्रमाणेच अमेरिकेतील अॅपल ऑनलाईन स्टोअरवरही हाच नियम लागू करण्यात आला आहे. तेथील ग्राहकांना चेकआउट करताना ऑर्डरमधील आयफोनची संख्या 2 पर्यंत कमी करण्याची सूचना दिली जात आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, बाजारात नवीन आयफोनची वाढती मागणी लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर होणारा काळाबाजार रोखणे, व्यापाऱ्यांकडून होणारी साठेबाजी थांबवणे आणि सर्वसामान्य ग्राहकांना सहजरीत्या आयफोन उपलब्ध करून देणे, या मुख्य उद्देशाने अॅपलने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.