रिसॉर्टला लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा दुर्वैवी मृत्यू; तर 9 जण जखमी

समुद्रकिनारी असलेल्या एका तीन मजली रिसॉर्टला शनिवारी अचानक लागलेल्या भीषण आगीत किमान 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले आहेत.

रिसॉर्टला लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा दुर्वैवी मृत्यू; तर 9 जण जखमी
Bangladesh Cox’s Bazar resort fire

बांगलादेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कॉक्स बाजार जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला आहे. समुद्रकिनारी असलेल्या एका तीन मजली रिसॉर्टला शनिवारी अचानक लागलेल्या भीषण आगीत किमान 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. कॉक्स बाजारमधील इनानी भागातील पातुआर्टेक बीचजवळ असलेल्या ‘टुपटुप रेस्टो अँड रिसॉर्ट’ मध्ये शनिवारी सकाळी सुमारे 6:30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी 1:30 च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

हेही वाचा – देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! ट्रॅव्हलर बस 15 फूट खोल खड्ड्यात कोसळली; 8 जणांचा मृत्यू

बांबू आणि लाकडाच्या बांधकामामुळे संपूर्ण रिसॉर्ट जळून खाक

उखिया पोलीस ठाण्याचे प्रमुख मोहम्मद अतिकुर रहमान मजुमदार आणि अग्निशमन दलाचे प्रवक्ते तलहा बिन जसीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन मजली रिसॉर्ट पूर्णपणे बांबू आणि लाकडापासून बनवण्यात आले होते. त्यामुळे आगीच्या ज्वाळांनी अत्यंत वेगाने संपूर्ण इमारतीला वेढा घातला. दुर्घटना घडली तेव्हा रिसॉर्टमध्ये सुमारे 30 हून अधिक पर्यटक उपस्थित होते. लाकडी बांधकाम असल्याने लोकांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि संपूर्ण इमारत काही वेळातच जळून खाक झाली. केवळ 4 ते 5 जण सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

आगीत भाजलेल्या आणि जखमी झालेल्या 9 जणांना तात्काळ कॉक्स बाजार सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी सबुकतागिन महमूद सोहेल यांनी सांगितले की, जखमींपैकी 5 जण गंभीर भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर एका किरकोळ जखमीला प्रथमोपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कॉक्स बाजारचे उपायुक्त ए. मन्नन यांनी सांगितले की, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्यांचे डीएनए नमुने घेतले जात आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, स्वयंपाकघरातून आगीची सुरुवात झाली असावी असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number