बेंगळुरू: 'कुंपणानेच शेत खाणे' या म्हणीचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना बेंगळुरूमध्ये उघडकीस आली असून, यामुळे बँकिंग क्षेत्रातील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँकेच्या पोलादी कपाटात तुमचे सोने सुरक्षित राहील, या सामान्यांच्या विश्वासाला तडा गेला आहे. गिरिनगर येथील एका बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने ग्राहकांच्या विश्वासाचा खून करत चक्क 2780 ग्रॅम म्हणजेच सुमारे दोन किलो 700 ग्रॅम सोने लंपास केले आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून सुरक्षिततेचा दावा करणाऱ्या बँकांच्या कारभारावर आता संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी अधिकाऱ्याने वरिष्ठ व्यवस्थापनाची कोणतीही परवानगी न घेता आणि ग्राहकांना अंधारात ठेवून लॉकरमधील सोन्यावर डल्ला मारला. हे चोरी केलेले सोने त्याने विविध खासगी फायनान्स कंपन्यांकडे गहाण ठेवले आणि त्या बदल्यात साडेतीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाटली. 5 फेब्रुवारी रोजी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी या अफरातफरीबाबत गिरिनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर आले.
हेही वाचा: Grampanchayat: राज्यातील ग्रामपंचायती बंद! 20 फेब्रुवारीला शासकीय कामकाज ठप्प होणार
तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, चोरी केलेली ही कोट्यवधींची रक्कम आरोपीने कोणत्याही गुंतवणुकीसाठी न वापरता 'ऑनलाइन सट्टेबाजी'मध्ये (Online Betting) वाया घालवली आहे. क्षणिक मोहापायी आणि सट्टेबाजीच्या व्यसनापायी एका जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याने अनेक ग्राहकांच्या आयुष्याची कमाई धोक्यात आणली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, चोरीला गेलेल्या एकूण सोन्यापैकी अद्याप केवळ 700 ग्रॅम सोने जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित सोन्याचा शोध सुरू आहे.
बँकिंग नियमांनुसार, ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या लॉकरला हात लावणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे. मात्र, या प्रकरणात अधिकाराचा गैरवापर करत ग्राहकांच्या हक्कांचे सरळ उल्लंघन करण्यात आले आहे. गहाण ठेवलेले सोने परत मिळवण्यासाठी आता कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली असून, खासगी फायनान्स कंपन्यांकडून सहकार्य न मिळाल्यास पोलिसांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आर्थिक फसवणुकीसोबतच गुन्हेगारी हेतू आणि विश्वासघाताचा पैलू तपास यंत्रणांनी गंभीरपणे घेतला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची नियमावली आणि सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. "बँकेत सोने ठेवले म्हणजे काम संपले, असे समजू नका," असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ग्राहकांनी त्यांच्या लॉकरमधील दागिन्यांची आणि कागदपत्रांची नियमित अंतराने प्रत्यक्ष बँकेत जाऊन तपासणी करावी. बँकेच्या सुरक्षा नियमांची माहिती करून घ्यावी आणि लॉकर हाताळताना कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा बदल दिसल्यास त्वरित वरिष्ठ बँक अधिकारी किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.
सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, बँकेच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींचाही शोध घेतला जात आहे. ग्राहकांच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्या या प्रवृत्तीमुळे बँकिंग क्षेत्रातील 'विश्वसनीयता' पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
हेही वाचा: Controversial Flyover Opens: मिरा-भाईंदरकरांचा वाहतुकीचा वनवास संपणार; मेट्रोच्या 'या' डबल डेकर पुलाचा मुहूर्त ठरला; पाहा कधी होणार सुरू