नवी दिल्ली : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited, BEL) आणि फ्रान्सची सॅफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स (Safran Electronics & Defence, SED) या कंपन्यांनी ‘Highly Agile Modular Munition Extended Range (HAMMER)’ या आधुनिक हवा ते जमीन अचूक मार्गदर्शित शस्त्र प्रणालीचे उत्पादन भारतात करण्यासाठी महत्त्वपूर्ण करार केला आहे. हा करार 24 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे झाला. यावेळी Defence Production Secretary संजीव कुमार आणि Safran चे CEO ओलीव्हर एंड्रीस उपस्थित होते.
BEL चे CMD मनोज जैन आणि SED चे Executive Vice President झिगलर यांनी संयुक्तपणे या करारावर स्वाक्षरी केली. HAMMER हे राफेल लढाऊ विमानावर वापरले जाणारे अत्यंत सक्षम आणि घातक शस्त्र मानले जाते. त्याची Precision Technology आणि Modular Design ही मोठी वैशिष्ट्ये असून, हे शस्त्र अनेक प्रकारच्या लढाऊ विमानांसाठी योग्य आहे. राफेलसोबतच हलके लढाऊ विमान तेजससाठीही HAMMER अत्यंत प्रभावी मानले जाते. ‘Make in India’ आणि ‘Atmanirbhar Bharat’ यांना चालना देण्यासाठी हा करार निर्णायक पाऊल मानला जात आहे.
BEL आणि SED यांनी एकत्रित करार (Joint Venture Collaboration Agreement, JVCA) करून भारतात HAMMER उत्पादनाचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे भारतीय संरक्षण उद्योगात प्रगत तंत्रज्ञानाची वाढ होईल आणि देशाची आत्मनिर्भरता आणखी मजबूत होईल. या प्रकल्पासाठी नवीन Private Limited Joint Venture कंपनी स्थापन केली जाणार असून BEL आणि Safran दोघांचा समान 50-50 टक्के हिस्सा असेल. प्रारंभी काही महत्त्वाचे भाग फ्रान्समधून आणले जातील, परंतु पुढील टप्प्यात उत्पादनातील सुमारे 60 टक्के भाग भारतातच तयार केला जाईल.
इलेक्ट्रॉनिक मॉड्यूल्स, मेकॅनिकल पार्ट्स, विविध सबअसेंब्ली हे सर्व टप्प्याटप्प्याने देशात उत्पादित केले जाणार आहेत. अंतिम जोडणी, तपासणी आणि निरीक्षण हे संपूर्ण काम BEL स्वतः करणार आहे. यामुळे देशात उच्च दर्जाचे संरक्षण तंत्रज्ञान उपलब्ध होईल आणि भारतीय उद्योगक्षेत्राला नवीन संधी मिळतील. संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारत जलदगतीने प्रगत होत असल्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.