बंगळुरू: बंगळुरूमधील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील 21 वर्षीय विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचा आरोप होत आहे. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी घडल्याचे सांगितले जात आहे, परंतु पीडितेने तिच्या पालकांना माहिती दिल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना बसवनगुडी परिसरातील घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी सातव्या सेमिस्टरची आहे, तर आरोपी पाचव्या सेमिस्टरमध्ये आहे. ते गेल्या तीन महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होते. पीडित विद्यार्थिनी एका विषयाचा अभ्यास करण्यासाठी कधीकधी पाचव्या सेमिस्टरच्या वर्गात जात होती, जिथे तिची भेट जीवन गौडाशी झाली.
नेमकं घडलं काय?
10 ऑक्टोबर रोजी कॉलेजमध्ये जेवणाच्या सुट्टीत जीवनने मुलीला फोन करून खाली भेटायला सांगितले. मुलीने सांगितले की, तिला त्याच्याकडून काही सामान घ्यायचे आहे, म्हणून ती त्याला भेटायला गेली. पण तिथून जीवन तिला आर्किटेक्चर
ब्लॉकच्या सातव्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे त्याने अचानक तिला जबरदस्तीने पकडले. मुलीने सांगितले की, ती तिथून कशीतरी पळून गेली आणि सहाव्या मजल्यावर पोहोचली, पण जीवनने तिचा पाठलाग केला आणि तिला पुरुषांच्या वॉशरूममध्ये ओढून आत बंद केले. वॉशरूममध्ये त्याने तिचा फोन हिसकावून घेतला. जेणेकरून ती मदतीसाठी फोन करू शकणार नाही. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. ही संपूर्ण घटना दुपारी 1:30 ते 1:50 च्या सुमारास घडली.
हेही वाचा: TV Actress Duped 65 Lakhs:एक टेलिव्हिजन अभिनेत्री डिजिटल अरेस्टची बळी, दिल्ली पोलीस अधिकारी सांगत 6.5 लाखांना गंडा
15 ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल
घटनेनंतर संध्याकाळी जीवनने पुन्हा मुलीला फोन केला आणि तिला गोळ्यांची गरज आहे का असे विचारले. यावेळी मुलगी घाबरली होती आणि पुढचे काही दिवस ती गप्प राहिली. नंतर दोन मैत्रिणींनी धाडस करून तिच्या कुटुंबाला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली. हनुमंतनगर पोलिसांनी जीवन गौडाविरुद्ध बलात्काराशी संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलम 64 अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान जीवनने हा प्रकार संमतीने घडल्याचा दावा केला. परंतु, पोलीस सर्व पैलूंचा तपास करत आहेत आणि कॉलेज कॅम्पसमधून पुरावे गोळा करत आहेत. सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.