भोपाळ: 90च्या दशकात प्रेक्षकांच्या चर्चेत राहिलेला जुदाई हा सिनेमा अनेकांना आजही आठवत असेल. त्या चित्रपटात पैशांच्या लालसेपोटी पत्नी पतीचा सौदा करते. मात्र मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे घडलेली घटना या कथानकापेक्षाही अधिक धक्कादायक ठरत आहे. येथे एका सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रेमप्रकरणातून असा कौटुंबिक समझोता झाला की, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलींसाठी तब्बल दीड कोटी रुपयांची मालमत्ता देण्यास प्रेयसीने होकार दिला.
या प्रकरणातील पुरुष एका सरकारी विभागात कार्यरत असून तो सध्या 42 वर्षांचा आहे. कार्यालयीन कामकाजादरम्यान त्याची ओळख त्याच विभागातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याशी झाली. वयाने सुमारे दहा वर्षांनी मोठी असलेली ही महिला हळूहळू त्याच्या आयुष्यात जवळची झाली. सुरुवातीला मैत्रीच्या स्वरूपात सुरू झालेले नाते पुढे प्रेमसंबंधात रूपांतरित झाले. मात्र या नात्याची चाहूल लागताच घरात वादाला तोंड फुटले.
पती-पत्नीतील सततच्या भांडणांचा सर्वाधिक फटका त्यांच्या दोन मुलींना बसू लागला. घरातील तणावपूर्ण वातावरणामुळे मानसिक त्रास सहन करणाऱ्या 16 वर्षांच्या मोठ्या मुलीने अखेर धाडसी पाऊल उचलत फॅमिली कोर्टात अर्ज केला. गेल्या पाच वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. समुपदेशनाच्या विविध फेऱ्यांनंतरही पती आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. त्याने स्पष्टपणे सांगितले की, तो आता पत्नीबरोबर संसार करू इच्छित नाही आणि प्रेयसीसोबतच आयुष्य घालवणार आहे.
या परिस्थितीत पत्नीसमोर कठीण निर्णय उभा राहिला. भावनिक वेदनांपेक्षा मुलींचे भविष्य आणि आर्थिक सुरक्षितता अधिक महत्त्वाची मानत तिने एक अट मांडली. घटस्फोटाच्या बदल्यात तिला राहण्यासाठी आलिशान डुप्लेक्स घर आणि रोख रक्कम मिळावी, अशी मागणी तिने केली. या सर्वांचा एकत्रित आकडा दीड कोटी रुपयांपर्यंत जात होता.
सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला तो तेव्हा, जेव्हा प्रेयसीने ही अट क्षणाचाही विलंब न करता स्वीकारली. आपल्या प्रेमासाठी एवढी मोठी आर्थिक जबाबदारी उचलण्याची तिची तयारी पाहून न्यायालयातील उपस्थितही स्तब्ध झाले. “माझ्या नात्यासाठी मी कोणालाही असहाय्य अवस्थेत सोडू इच्छित नाही,” अशी भूमिका तिने मांडली.
या सलोख्यामागे पत्नीचा हेतू संपत्तीचा नव्हे, तर मुलींच्या शिक्षणाचा आणि सुरक्षित भवितव्याचा आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भोपाळच्या फॅमिली कोर्टाच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडल्याची चर्चा आहे, जिथे प्रेयसीने प्रेमासाठी इतकी मोठी किंमत मोजली. या घटनेने नातेसंबंध, जबाबदारी आणि भविष्य याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.