Nightclub Tragedy in Goa: उत्तर गोव्यातील अर्पोरा परिसरात रोमियो लेनजवळील बर्च नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने बहुतेकांचा मृत्यू श्वासावरोधामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मालक व व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर
या दुर्घटनेनंतर क्लबचे मालक आणि महाव्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर क्लबच्या मालकाला पोलिसांनी अटक केली. आगीमागील कारण शोधण्यासाठी आणि जबाबदारांवर कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे गोवा पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - Ashtamudi Lake Fire: केरळच्या अष्टमुडी तलावात भीषण आग; 10 हून अधिक मासेमारी नौका जळून खाक
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आदेश
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेत दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, ही गोव्यातील अशा प्रकारची पहिलीच मोठी घटना आहे. मृतांना न्याय मिळावा आणि दुर्घटनेचे निश्चित कारण समोर यावे म्हणून चौकशी जलदगतीने होईल. जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - Goa Fire Incident: गोव्यात नाइट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट; 23 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांचा निष्काळजी अधिकाऱ्यांवर संताप
लोक कसे अडकले?
प्राथमिक अहवालानुसार आग पहिल्या मजल्यावर लागली. क्लबमध्ये मोठी गर्दी आणि अरुंद दरवाजे असल्याने लोकांना बाहेर पडणे कठीण झाले. अनेक जण तळमजल्यावर धावत गेले, परंतु तेथेच ते अडकले. क्लबचे सुरक्षा रक्षक संजय कुमार गुप्ता यांनी सांगितले, रात्री 11 ते 12 दरम्यान आग लागली. त्या वेळेस एका डीजे कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती. आग अचानक भडकली आणि गोंधळ उडाला.
पंतप्रधानांची मदत घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मृतांमध्ये 14 क्लब कर्मचारी आणि 4 पर्यटकांचा समावेश आहे. जखमी 7 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून, अग्निशमन विभाग आणि पोलीस तपास करत आहेत.