नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानाचा शुक्रवारी सकाळी एक मोठा अपघात थोडक्यात टळला. शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेले इंडिगो एअरलाइन्सचे विमान लँडिंगनंतर पार्किंग बे कडे जात असताना रनवेवरील पोलला जाऊन धडकले. दरम्यान या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
या धडकेमुळे विमानाचे पुढच्या भागाचे (नोज सेक्शन) किरकोळ नुकसान झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 9 वाजता नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानाने धावपट्टीजवळील व्हिज्युअल डॉकिंग गायडन्स सिस्टिमला धडक दिली. विमान क्रमांक 6E 225, VT-NOG चा अपघात घडला असून सर्व प्रवासी आणि विमान कर्मचारी सुरक्षित आहेत.
तसेच प्रवाशांना मॅन्युअल पायऱ्यांच्या मदतीने सुखरूप खाली उतरवण्यात आले. या घटनेने विमानतळावर काही काळ गडबड उडाली होती. हा अपघात कशामुळे घडला याचं कारण समोर आलेले नाही. दरम्यान या घटनेनंतर श्रीनगर विमानतळावरील इतर सर्व विमान सेवा आणि उड्डाणे सुरळीतपणे सुरू आहेत. त्यांच्या उड्डाणावर आणि इतर प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही.