इराण आणि अमेरिका यांच्यात तब्बल 107 दिवस सुरू असलेला संघर्ष अखेर 14 कलमी शांतता करारानंतर थांबला आहे. या करारामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुजवरील तणावपूर्ण परिस्थितीही निवळली आहे. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून आला असून क्रूड ऑइलच्या किंमतीत सुमारे 4 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. दर घसरल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्याची सुरुवातही क्रूड ऑइल बाजारात मोठ्या घसरणीसह झाली आहे, ज्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात सकारात्मक बदल दिसत आहेत.
आज सोमवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली असून ते सुमारे 4 टक्क्यांनी खाली आले आहेत. दरम्यान, देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 25 मेपासून इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर क्रूड ऑइलचे दर घसरले असले तरी देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठा बदल दिसून आलेला नाही.
ब्रेंट क्रूडच्या दरात आज सकाळी मोठी घसरण झाली असून ते 4.03 टक्क्यांनी खाली येत $83.81 प्रति बॅरलवर आले आहे. त्याचप्रमाणे WTI क्रूडमध्येही 4.68 टक्क्यांची घट नोंदवली गेली असून ते $80.91 प्रति बॅरलवर ट्रेड करत आहे. देशांतर्गत इंधन दरांमध्ये मात्र कोणताही मोठा बदल दिसत नाही. मुंबईत पेट्रोलचा दर 111.21 रुपये प्रति लीटर तर डिझेल 97.83 रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.20 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.
कोलकात्यात पेट्रोल 113.51 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर इतका दर आहे. तर चेन्नईत पेट्रोलचा दर 107.77 रुपये प्रति लीटर असून डिझेल 99.55 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.