India Energy Crisis: पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम होत असून त्याचे पडसाद भारतातही उमटताना दिसत आहेत. विशेषतः LPG आणि नैसर्गिक गॅसच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही काही तातडीची पावले उचलली आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी कॅनडा पुढे सरसावल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक पातळीवर सुरू असलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमधील ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. त्याचा परिणाम भारतासारख्या मोठ्या ऊर्जा वापर असलेल्या देशांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील काही भागांत LPG आणि नैसर्गिक गॅसच्या उपलब्धतेबाबत चर्चा सुरू असताना सरकारने वितरण प्रक्रियेत काही तात्पुरते बदल केले आहेत. नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, कॅनडाने भारताला लिक्विफाइड नॅच्युरल गॅस (LNG) पुरवठ्याबाबत महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी एका निवेदनातून सांगितले की, ऊर्जा क्षेत्रात कॅनडा जगभरात विश्वासार्ह भागीदार म्हणून ओळखला जातो. भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज आहे आणि त्या गरजा पूर्ण करण्यात कॅनडा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
कार्नी यांनी भारताच्या वाढत्या ऊर्जा मागणीचा उल्लेख करत सांगितले की, आगामी काळात भारतात ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. २०४० पर्यंत भारतातील ऊर्जा वापर जवळपास दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेता भारताने विविध देशांसोबत ऊर्जा सहकार्य वाढवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कॅनडाकडून पुरवला जाणारा LNG हा तुलनेने कमी कार्बन उत्सर्जन करणारा इंधन प्रकार मानला जातो. आशिया आणि युरोपातील अनेक देशांमध्ये वीज निर्मिती, उद्योग आणि घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात या गॅसचा वापर केला जातो. त्यामुळे भारतासाठीही हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो.
ऊर्जा सहकार्याबरोबरच कॅनडाने भारताला महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठ्याचीही ऑफर दिली आहे. स्वच्छ ऊर्जा, उत्पादन उद्योग आणि अणुऊर्जा क्षेत्रासाठी लागणाऱ्या विविध खनिजांची भारताला मोठ्या प्रमाणात गरज आहे. कॅनडामध्ये जगातील अनेक मोठ्या खाण कंपन्या कार्यरत असून या क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये सहकार्याची संधी असल्याचे सांगितले जात आहे.
भारतानेही कॅनडासोबत ऊर्जा व्यापार वाढवण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. कच्चे तेल, LPG, LNG आणि युरेनियम यांसारख्या ऊर्जा स्रोतांच्या खरेदीबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याचे समजते. भविष्यात भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाने दिलेली ही ऑफर भारतासाठी महत्त्वाची ठरू शकते. आगामी काळात या प्रस्तावावर दोन्ही देशांमध्ये अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे.