Friday, December 05, 2025 02:31:28 AM

Ahmedabad Plane Crash : 'वैमानिकांचा दोष नाही!' सर्वोच्च न्यायालयाने कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्या वडिलांचं भावनिक सांत्वन करत दिला धीर

कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान 'भावनिक ताण बाळगू नका,' असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिला.

ahmedabad plane crash   वैमानिकांचा दोष नाही सर्वोच्च न्यायालयाने कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्या वडिलांचं भावनिक सांत्वन करत दिला धीर

SC on Captain Sumeet Sabharwals Father Pushkaraj Sabharwal's Petition : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण दुर्घटना प्रकरणात मुख्य वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल यांना कोणीही दोष दिलेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. या दुर्घटनेसंदर्भात कोणताही भावनिक ताण (Emotional Burden) बाळगू नका, असा सल्लाही न्यायालयाने कॅप्टन सभरवाल यांचे मुंबईस्थित 91 वर्षीय वडील पुष्कराज सभरवाल यांना दिला.

अपघाताची चौकशी आणि याचिका
12 जून रोजी एअर इंडियाच्या 'एआय-171' या ड्रीमलायनर विमानाने उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटांत ते विमानतळापासून काही अंतरावर कोसळले होते. या अपघातात प्रवासी आणि काही नागरिकांसह एकूण 260 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील समितीमार्फत आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली केली जावी, अशी मागणी करणारी याचिका पुष्कराज सभरवाल आणि भारतीय वैमानिक संघाने (Indian Pilots' Association) दाखल केली होती.

खंडपीठाची टिप्पणी
या याचिकेवर न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालकांना (DGCA) नोटीस बजावली. 'विमान अपघात चौकशी ब्यूरो'च्या (AAIB) प्राथमिक अहवालात सभरवाल यांना दोष दिला जाईल असे कुठेही सूचित केलेले नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

प्राथमिक अहवालातून दोष नाही
न्यायाधीशांनी 'एएआयबी'च्या प्राथमिक अहवालातील एक परिच्छेद वाचून दाखवला, ज्यात केवळ कॅप्टन सुमीत सभरवाल आणि त्यांचे सहवैमानिक क्लाईव्ह कुंदर यांच्यातील संभाषणाचा संदर्भ असल्याचे नमूद केले होते. गरज पडल्यास, या दुर्दैवी दुर्घटनेबद्दल वैमानिकांना दोष दिला जाऊ नये असे न्यायालय स्पष्ट करेल, असे आश्वासनही न्या. कांत आणि न्या. बागची यांच्या खंडपीठाने दिले. ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी पुष्कराज सभरवाल यांची बाजू मांडली.

हेही वाचा - Delhi Airport ATC glitch : तांत्रिक बिघाडामुळे दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे हाल! दिवसभरात 800 हून अधिक विमानांना विलंब

परदेशी माध्यमांवर न्यायालयाची टीका
शंकरनारायणन यांनी न्यायालयाला सांगितले की, अमेरिकेतील प्रतिष्ठित वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या एका लेखामध्ये नाव गोपनीय ठेवलेल्या सरकारी सूत्रांचा हवाला देत वैमानिकांना दोष दिला होता आणि त्यानंतरच वैमानिकांना दोष देणे सुरू झाले.

'परदेशी माध्यमांचा खोडसाळपणा'; खंडपीठाची कठोर टिप्पणी
यावर खंडपीठाने कठोर टिप्पणी केली. "हे केवळ भारताला दोष देण्यासाठी खोडसाळ वृत्तांकन होते. आम्हाला परदेशी माध्यमांच्या वृत्तांनी फरक पडत नाही. यात वैमानिकांचा दोष होता यावर देशातील कोणाचाही विश्वास नाही," असे न्यायालयाने नमूद केले. न्या. बागची यांनी तर "या वृत्तामुळे तुम्ही दुःखी झाला असाल, तर तुम्ही अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल करू शकता," असा सल्लाही दिला.

'सर्वप्रथम हा एक दुर्दैवी विमान अपघात होता. दुसरे, तुमच्या मुलाला दोष दिला जात आहे याचे तुम्ही स्वतःवर ओझे बाळगू नये. विमान कोसळल्याबद्दल वैमानिकाला दोष दिलेला नाही. तो एक अपघात होता,' असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले.

हेही वाचा - Parliament Winter Session 2025: संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली माहिती


सम्बन्धित सामग्री