Wednesday, November 19, 2025 12:59:47 PM

Jayant Naralikar : 'महाविस्फोट सिद्धांता'ला आव्हान देणाऱ्या जयंत नारळीकरांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’; केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा

पद्म पुरस्कारांच्या धर्तीवर आधारित, देशातील हे सर्वोच्च विज्ञान पुरस्कार देण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या पुरस्कारांमध्ये प्रख्यात दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

jayant naralikar  महाविस्फोट सिद्धांताला आव्हान देणाऱ्या जयंत नारळीकरांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारां’ ची शनिवारी घोषणा केली आहे. पद्म पुरस्कारांच्या धर्तीवर आधारित, देशातील हे सर्वोच्च विज्ञान पुरस्कार देण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या पुरस्कारांमध्ये प्रख्यात दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ नारळीकर यांनी प्रसिद्ध 'महाविस्फोट सिद्धांताला' आव्हान दिले होते.

पुरस्कारांचे स्वरूप आणि उद्दिष्ट
या पुरस्कारांच्या यादीत ‘विज्ञान रत्न’ सह आठ ‘विज्ञानश्री’, चौदा ‘विज्ञान युवा’ आणि एका ‘विज्ञान संघ’ पुरस्काराचा समावेश आहे. ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आयुष्यभरातील अतुलनीय कामगिरी आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी दिला जातो. याशिवाय, ‘विज्ञानश्री’ पुरस्कार विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो.

‘विज्ञान युवा’ पुरस्कार 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या, परंतु याच क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना प्रदान केला जातो. तर ‘विज्ञान संघ’ पुरस्कार, तीन किंवा त्याहून अधिक शास्त्रज्ञ, संशोधक किंवा नवोन्मेषकांच्या संघाच्या एकत्रित कामगिरीचा सन्मान करण्यासाठी दिला जातो.

हेही वाचा - Fake Universities in India : विद्यार्थ्यांनो सावधान! 'यूजीसी'ने जाहीर केली देशातील 22 'बनावट विद्यापीठां'ची यादी; महाराष्ट्रातही चार, राज्य सरकारांचे कायमच दुर्लक्ष

विविध श्रेणीतील पुरस्कार मानकरी

विज्ञानश्री पुरस्कार (आठ मानकरी):
कृषी विज्ञान: ज्ञानेंद्र प्रताप
अणुऊर्जा: युसुफ मोहम्मद शेख
जीवशास्त्र: के थांगराज
रसायनशास्त्र: प्रदीप थलाप्पिल
अभियांत्रिकी विज्ञान: अनिरुद्ध भालचंद्र पंडित
पर्यावरणशास्त्र: एस. वेंकट मोहन
गणित आणि संगणकशास्त्र: महान महाराज
अवकाशशास्त्र आणि तंत्रज्ञान: जयन एन.

विज्ञान युवा पुरस्कार (चौदा मानकरी):
कृषी विज्ञान: जगदीश गुप्ता कपुगंती आणि सतेंद्र कुमार मंगरुथिया
जीवशास्त्र: देबरका सेनगुप्ता आणि दीपा आगाशे
रसायनशास्त्र: दिब्येंदु दास
पृथ्वी विज्ञान: वलिउर रहमान
अभियांत्रिकी विज्ञान: अरकाप्रवा बसू
गणित आणि संगणकशास्त्र: सब्यसाची मुखर्जी आणि श्वेता प्रेम अग्रवाल
वैद्यकीय: सुरेश कुमार
भौतिकशास्त्र: अमित कुमार अग्रवाल आणि सुरहुद श्रीकांत मोरे
अवकाशशास्त्र आणि तंत्रज्ञान: अंकुर गर्ग
तंत्रज्ञान आणि नवोपक्रम: मोहनशंकर शिवप्रकाशम

विज्ञान संघ पुरस्कार:
हा पुरस्कार जम्मू आणि काश्मीरमध्ये लव्हेंडर उपक्रम राबवणाऱ्या ‘सीएसआयआर ॲरोमा मिशन’ संघाला जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा - RRB NTPC Bharti 2025: स्टेशन मास्टर ते टीसीपर्यंत! भारतीय रेल्वेत 8800+ पदांसाठी मेगाभरती


सम्बन्धित सामग्री