Arunachal Pradesh : मध्यपूर्वेतील अशांततेतच चीनच्या कुरापती पुन्हा सुरू! अरुणाचल प्रदेशवर पुन्हा ठोकला दावा; भारताचेही सडेतोड उत्तर

चीनच्या या काल्पनिक दावेदारीला भारतानेही जशास तसे उत्तर दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी चीनचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

Arunachal Pradesh : मध्यपूर्वेतील अशांततेतच चीनच्या कुरापती पुन्हा सुरू! अरुणाचल प्रदेशवर पुन्हा ठोकला दावा; भारताचेही सडेतोड उत्तर

China Challenges Sovereignty of India : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या ठिणगीमुळे जागतिक राजकारण तापलेले असतानाच, चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशबाबत एक खळबळजनक दावा करून पुन्हा एकदा तणाव वाढवला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशला 'जांगनान' असे संबोधत, हा प्रदेश चीनचाच अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार केला आहे. इतकेच नाही तर, जांगनान क्षेत्रातील विविध ठिकाणांची नावे बदलण्याचा किंवा त्यांना नवीन नावे देण्याचा कायदेशीर अधिकार केवळ आमच्याकडेच आहे, असे चीनचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी मंगळवारी म्हटले. भारताने या भागावर 'अवैध' पद्धतीने कब्जा केल्याचा आरोपही चीनकडून करण्यात आला असून, यामुळे सीमेवरील परिस्थिती पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे आहेत.

भारताचा चीनला सडेतोड इशारा
चीनच्या या काल्पनिक दावेदारीला भारतानेही जशास तसे उत्तर दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी चीनचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. "अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील," असे भारताने ठणकावून सांगितले आहे. चीनकडून दिली जाणारी नावे ही पूर्णपणे 'काल्पनिक' असून, अशा प्रकारच्या कृतीमुळे जमिनीवरील वास्तव बदलणार नाही, असा सडेतोड इशारा भारताने दिला आहे. भारताच्या हद्दीत हस्तक्षेप करण्याचा चीनचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Jag Vikram: इराण-अमेरिका संघर्षाच्या विळख्यातून 'जग विक्रम'ची सुटका; 20 हजार टन LPG घेऊन भारतीय जहाज कांडला बंदरात दाखल

नावे बदलण्याचे जुनेच तंत्र
विशेष म्हणजे, चीनकडून अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलून ती प्रकाशित करण्याचे सत्र 2017 पासून सातत्याने सुरू आहे. चीनच्या 'ग्लोबल टाइम्स'च्या रिपोर्टचा हवाला देत जियाकुन यांनी म्हटले की, ऐतिहासिकदृष्ट्या हा भाग त्यांचाच आहे. तथापि, या वादादरम्यान चीनने असेही म्हटले आहे की, सध्या भारत आणि चीनमधील संबंध स्थिर आहेत आणि ते अधिक सुधारण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. परंतु, एका बाजूला मैत्रीची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान द्यायचे, ही चीनची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा उघड झाली आहे.

इराण-अमेरिका युद्धाच्या सावलीत नवा तणाव
जागतिक स्तरावर इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष काहीसा शांत होत असल्याचे चित्र असतानाच चीनने हा नवीन वाद उकरून काढला आहे. भारत आणि चीनमध्ये अरुणाचल प्रदेश हा अनेक दशकांपासून वादाचा मुद्दा राहिला आहे. चीनने हा दावा अशा वेळी केला आहे जेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष पश्चिम आशियातील संघर्षावर आहे. चीनच्या या नव्या कुरापतींमुळे दक्षिण आशियातील भूराजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता असून, भारताने सीमेवर आपली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.

हेही वाचा – PM Narendra Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन! तब्बल 40 मिनिटांच्या संभाषणात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा; लवकरच होऊ शकते मोठी घोषणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number