Karur Stampede: तामिळनाडूतील करूर शहरात शनिवारी झालेल्या रॅलीदरम्यान भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 40 नागरिकांचा मृत्यू, तर सुमारे 100 लोक जखमी झाले. घटनेनंतर अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या पक्षाने या प्रकरणामागे द्रमुकचा कट असल्याचा आरोप केला आहे.
उच्च न्यायालयात याचिका
विजय यांच्या टीव्हीके पक्षाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, या याचिकेत विशेष तपास पथक (SIT) स्थापन करणे किंवा चौकशी सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी करण्यात आली आहे. पक्षाचे वकील अरिवाझगन यांनी राज्य सरकारचा सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले हा दावा सरळ फेटाळून लावला.
हेही वाचा - Thalapathy Vijay Stampede :विजय थलापतींच्या रॅलीत नेमकं काय घडलं? डीजीपींनी केले धक्कादायक खुलासे
वकील अरिवाझगन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, करूर घटनेत कट रचण्यात आला होता. आम्हाला स्थानिक नागरिक व सीसीटीव्ही फुटेजमधून अशी माहिती मिळाली आहे की सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा या कटात सहभाग होता.
राज्य सरकारचे प्रत्युत्तर
राज्य सरकारच्या मते, रॅलीच्या ठिकाणी दुपारपासूनच गर्दी वाढत होती. संध्याकाळी विजय पोहोचेपर्यंत 10 हजार क्षमतेच्या मैदानात तब्बल 27 हजार लोकांची उपस्थिती होती. सरकारने ही गर्दी जाणीवपूर्वक वाढवण्यात आल्याचा आरोप केला. मात्र टीव्हीकेच्या वकिलांनी हा दावा नाकारत सांगितले की, विजय उशिरा आले कारण वाहतूक कोंडी होती. पक्षाची कोणतीही चूक नाही.
हेही वाचा - TVK Vijay Rally Stampede: सुपरस्टार विजय थलापतींच्या सभेत चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा 39 वर, अनेक जखमी
टीव्हीके नेत्यांवर गुन्हे दाखल
दरम्यान, राज्य सरकारने काही टीव्हीके नेत्यांविरुद्ध सुरक्षा नियमांचे उल्लंघन व हत्येसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, या दुर्घटनेची चौकशी निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयीन आयोगाकडे सोपवण्यात आली आहे.