Cancer Drug Pricing Row: भारतात कर्करोगावरील महागडी औषधे अधिक परवडणारी आणि लाखो रुग्णांसाठी सहज उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावर केरळ उच्च न्यायालयात सध्या एक महत्त्वाचा खटला सुरू आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, या जीवनरक्षक औषधांच्या स्वस्त ‘जेनेरिक’ आवृत्त्यांच्या मागणीला प्रमुख औषध कंपन्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा कायदेशीर लढा प्रामुख्याने स्तनाच्या कर्करोगावरील (ब्रेस्ट कॅन्सर) रिबोसायक्लिब (Ribociclib) आणि अबेमासायक्लिब (Abemaciclib) या दोन प्रमुख औषधांशी संबंधित असून, यामध्ये अतिशय जास्त नफा कमावला जात असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
भारतात विक्रीचा अत्यल्प वाटा आणि जागतिक आकडेवारी
या खटल्यादरम्यान सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या काळात नोव्हार्टिस (Novartis) कंपनीच्या ‘रिबोसायक्लिब’ची जागतिक विक्री सुमारे 12.7 अब्ज डॉलर्स इतकी होती. याउलट, याच कालावधीत भारतातील विक्री केवळ 55.7 दशलक्ष डॉलर्स इतकी नोंदवली गेली, जी एकूण जागतिक विक्रीच्या अवघी 0.4 टक्के आहे. तसेच, 2020 ते 2025 या कालावधीत एली लिली (Eli Lilly) कंपनीच्या ‘अबेमासायक्लिब’ची एकूण जागतिक विक्री सुमारे 19.6 अब्ज डॉलर्स होती, तर भारतातील विक्री केवळ 31.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जागतिक विक्रीच्या 0.16 टक्के इतकी होती. ही भारतातील विक्रीची आकडेवारी ‘इप्सोस’ (IPSOS) या प्रतिष्ठित बाजार संशोधन संस्थेकडून घेण्यात आली होती, तर जागतिक विक्रीची माहिती कंपन्यांच्या अधिकृत वार्षिक अहवालांतून गोळा करण्यात आली आहे.
कंपन्यांचे युक्तिवाद आणि संशोधनावर प्रश्नचिन्ह
न्यालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये औषध कंपन्यांनी असा युक्तिवाद केला आहे कि, त्यांनी ही दोन्ही अत्याधुनिक औषधे विकसित करण्यासाठी प्रचंड संशोधन खर्च केला आहे; मात्र त्यांनी विकासाचा नेमका खर्च उघड करण्यास टाळाटाळ केली आहे. औषध उद्योगाचा पाठिंबा असलेल्या ‘टफ्ट्स सेंटर फॉर द स्टडी ऑफ ड्रग डेव्हलपमेंट’च्या एका अभ्यासानुसार, नवीन औषध बाजारात आणण्यासाठी सरासरी 2.6 अब्ज डॉलर्सचा खर्च येतो.
मात्र, औषधांच्या या अवाजवी किमतींचे समर्थन करण्यासाठी खर्च फुगवून सांगितल्याबद्दल या अभ्यासावर अनेकदा टीका झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, जरी हे आकडे ग्राह्य धरले, तरी दोन्ही कंपन्यांनी आपला उत्पादन आणि संशोधन खर्च अनेक पटींनी वसूल केला आहे. नॉलेज इकोलॉजी इंटरनॅशनल (KEI) चे कार्यकारी संचालक जेमी लव्ह यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, नोव्हार्टिसने रिबोसायक्लिबच्या चाचण्यांवर 494.5 दशलक्ष डॉलर्स खर्च केले, तर लिलीने अबेमासायक्लिबवर 469 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केला. याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या ताज्या गणनेनुसार, रिबोसायक्लिबच्या क्लिनिकल चाचण्यांचा खर्च अंदाजे 667.5 दशलक्ष डॉलर्स आणि अबेमासायक्लिबसाठी 633 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक आहे.