Friday, March 13, 2026 07:49:21 AM

Galgotias University Controversy: AI समिटमध्ये चिनी रोबोटवरून वाद; गलगोटियास विद्यापीठाचा स्टॉल हटवला, काय आहे नेमकं प्रकरण?

गलगोटियास विद्यापीठाने आपल्या स्टॉलवर &quotओरियन&quot (Orion) नावाचा रोबोट इन-हाऊस इनोव्हेशन म्हणून प्रदर्शित केला होता.

galgotias university controversy ai समिटमध्ये चिनी रोबोटवरून वाद गलगोटियास विद्यापीठाचा स्टॉल हटवला काय आहे नेमकं प्रकरण

Galgotias University Controversy: भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026' (India AI Impact Summit 2026) मध्ये बुधवारी एका रोबोटिक कुत्र्यावरून मोठा वाद निर्माण झाला. गलगोटियास विद्यापीठाने आपल्या स्टॉलवर "ओरियन" (Orion) नावाचा रोबोट इन-हाऊस इनोव्हेशन म्हणून प्रदर्शित केला होता. मात्र, हा रोबोट प्रत्यक्षात चिनी कंपनी 'युनिट्री' (Unitree) द्वारे उत्पादित 'Unitree Go2' असल्याचे उघड झाले. या प्रकारानंतर सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यापीठाला त्यांचा स्टॉल रिकामा करण्यास सांगण्यात आले आणि तेथील वीज पुरवठाही खंडित करण्यात आला.

नेमका वाद काय?
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या जागतिक दर्जाच्या परिषदेत देशांतर्गत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे अपेक्षित होते. मात्र, गलगोटियास विद्यापीठाने प्रदर्शित केलेला रोबोटिक कुत्रा हा बाजारात सहज उपलब्ध असलेला आणि भारतात सुमारे 2-3 लाख रुपयांना विकला जाणारा चिनी बनावटीचा रोबोट निघाला. "आम्ही एआयमध्ये 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे आणि हा रोबोट आमच्या 'ओरियन सेंटर ऑफ एक्सलन्स'ने विकसित केला आहे," असा दावा विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा सिंग यांनी एका मुलाखतीत केला होता. हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट होताच सोशल मीडियावर टीकेची झोड उठली.

विरोधी पक्षांची तीव्र टीका
या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसने 'X' वर पोस्ट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "मोदी सरकारने एआयच्या बाबतीत जागतिक स्तरावर भारताची थट्टा केली आहे. चिनी रोबोट आपलेच असल्याचे दाखवणे हे लाजिरवाणे आहे," असे काँग्रेसने म्हटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या परिषदेला "अव्यवस्थित पीआर तमाशा" असे संबोधले. भारताच्या प्रतिभेचा वापर करण्याऐवजी चिनी उत्पादनांचे प्रदर्शन करून देशाच्या प्रतिमेचे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा - AI Impact Summit 2026: दिल्लीत AI चा महाकुंभ, पण बिल गेट्स यांचे निमंत्रण भारत सरकारकडून रद्द; काय आहे यामागचं कारण

विद्यापीठाचे स्पष्टीकरण
दरम्यान, वाढत्या वादानंतर गलगोटियास विद्यापीठाने दोन वेगवेगळी निवेदने प्रसिद्ध केली. पहिल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, "आम्ही हा रोबोट स्वतः बनवल्याचा दावा कधीच केला नाही. आमचे लक्ष जागतिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यावर आहे." मात्र, प्राध्यापकांच्या आधीच्या दाव्यामुळे हे स्पष्टीकरण टिकू शकले नाही. दुसऱ्या निवेदनात विद्यापीठाने त्यांच्याविरोधात 'प्रचार मोहीम' चालवली जात असल्याचा दावा केला आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी जागतिक संसाधने वापरणे काळाची गरज असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न
स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांना आणि 'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहन देणाऱ्या शिखर परिषदेत अशा प्रकारे आयात केलेले चिनी तंत्रज्ञान स्वतःचे म्हणून दाखवल्याने देशाच्या एआय धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या या घटनेमुळे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री