सीएसआयआर यूजीसी नेट (CSIR UGC NET) डिसेंबर 2025 परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था म्हणजेच एनटीए (National Testing Agency) 27 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत निश्चित केली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ csirnet.nta.nic.in वर जाऊन आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना प्रथम वेबसाइटवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर अर्ज फॉर्म अचूक माहितीने भरून सबमिट करावा. सबमिशन झाल्यानंतर पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रत जतन करावी, असा सल्ला दिला आहे.
अर्ज शुल्कासाठीही श्रेणीअन्वये वेगवेगळी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1150 रुपये शुल्क भरावे लागतील. सामान्य-ईडब्ल्यूएस आणि इतर मागासवर्गीय (नॉन क्रीमी लेअर) प्रवर्गातील उमेदवारांना 600 रुपये भरावे लागतील. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि तृतीयपंथी उमेदवारांसाठी शुल्क 325 रुपये आहे. शुल्क नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि UPI द्वारे भरता येईल.
ऑनलाइन शुल्क व्यवहार करण्याची अंतिम मुदत 28 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. अर्जामध्ये कुठल्याही माहितीमध्ये दुरुस्ती करायची असल्यास उमेदवारांना 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सुधारित अर्ज सादर करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परीक्षा 18 डिसेंबर 2025 रोजी देशभरातील विविध शहरांमध्ये संगणकाधारित पद्धतीने (Computer Based Test) आयोजित केली जाणार आहे. दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येईल. पहिल्या सत्राची वेळ सकाळी 9 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत तर दुसरे सत्र दुपारी 3 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल.
एनटीएने सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणारी अधिसूचना नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला आहे. आगामी अपडेट्स, प्रवेशपत्रांची उपलब्धता आणि परीक्षेसंबंधी इतर सर्व माहिती याच पोर्टलवर जाहीर केली जाणार आहे.