Cybercrime Statistics 2025: सायबर भामट्यांचा देशाला विळखा; एका वर्षात 3 कोटींहून अधिक भारतीयांची डिजिटल फसवणूक

2025 मधील आकडेवारीने सर्वांनाच हादरवून सोडले असून, केवळ एका वर्षात '1930' या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइनवर तब्बल 32.4 दशलक्ष (3 कोटी 24 लाख) कॉल्सची नोंद झाली आहे.

Cybercrime Statistics 2025: सायबर भामट्यांचा देशाला विळखा; एका वर्षात 3 कोटींहून अधिक भारतीयांची डिजिटल फसवणूक

Cybercrime Statistics 2025:  भारतातील डिजिटल विश्वाचा विस्तार ज्या वेगाने होत आहे, त्याच वेगाने सायबर गुन्हेगारीचे जाळेही पसरत चालले आहे. 2025 मधील आकडेवारीने सर्वांनाच हादरवून सोडले असून, केवळ एका वर्षात '1930' या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइनवर तब्बल 32.4 दशलक्ष (3 कोटी 24 लाख) कॉल्सची नोंद झाली आहे. याचाच अर्थ, देशात सरासरी दर सेकंदाला 1 व्यक्ती सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी फोन करत आहे.

हेल्पलाइनवरील वाढता ताण आणि भीषण वास्तव
गेल्या 3 वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास सायबर धोक्यांची तीव्रता स्पष्ट होते. 2023 मध्ये या हेल्पलाइनवर 9.64 दशलक्ष कॉल्स आले होते, जे 2024 मध्ये वाढून 22.1 दशलक्ष झाले. 2025 मध्ये हा आकडा 32.4 दशलक्षांवर पोहोचला आहे. 2024 मध्ये कॉलच्या संख्येत 130 टक्के इतकी प्रचंड वाढ झाली होती, तर 2025 मध्ये हा वाढीचा दर 46.4 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. वाढीचा दर काहीसा घटला असला तरी तक्रारींची एकूण संख्या मात्र सातत्याने वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणांवर मोठा ताण येत आहे.

दररोज सरासरी 88,976 कॉल्सची नोंद
'न्यूज 18 च्या अहवालानुसार, गेल्या वर्षी या हेल्पलाइनने दररोज सरासरी 88,976 कॉल्स हाताळले आहेत. 2023 मधील दररोजच्या 26,411 कॉल्सच्या तुलनेत ही वाढ तिप्पट आहे. हे केंद्र सरकारद्वारे संनियंत्रित आणि राज्यांच्या पोलीस विभागांमार्फत चालवले जाणारे केंद्र असून, आता या यंत्रणेच्या विस्ताराची गरज निर्माण झाली आहे. आर्थिक फसवणूक, फिशिंग, ओळख चोरी (Identity Theft) आणि सोशल मीडिया हॅकिंग यांसारख्या गुन्ह्यांनी भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांना विळखा घातला आहे.

'1930' हेल्पलाइन: पैशांच्या बचावासाठी शेवटची आशा
अधिकाऱ्यांच्या मते, ही हेल्पलाइन आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 'प्राथमिक प्रतिसाद यंत्रणा' (First-response system) म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जर फसवणूक झाल्या झाल्या त्वरित या क्रमांकावर तक्रार केली, तर सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात 'फ्रीज' करणे शक्य होते. वाढती कॉल संख्या हे केवळ गुन्हे वाढल्याचे लक्षण नसून, लोकांमध्ये या हेल्पलाइनबद्दल जागृती वाढल्याचेही द्योतक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

सरकारची नवी रणनीती; सायबर ठाण्यांचा विस्तार
वाढत्या धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सरकार आता 'सहयोग', 'समन्वय' आणि 'प्रतिबिंब' यांसारख्या मंचांच्या माध्यमातून राज्यांमध्ये ताळमेळ बसवत आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सायबर पोलीस ठाण्यांचे जाळे विस्तारण्याची योजना आखली जात आहे. तसेच, 1930 हेल्पलाइनचे आधुनिकीकरण करून अधिक प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

हेही वाचा – Akola Crime : आधी गळा आवळला, नंतर अर्धवट जाळलं; अकोल्यात सादीकने केली रविना पवारची हत्या; प्रकरणाला लव्ह जिहादचं वळण?

नागरिकांनी काय करावे?
डिजिटल युगात सुरक्षित राहण्यासाठी कोणतीही संशयास्पद लिंक न उघडणे आणि आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना न देणे आवश्यक आहे. जर तुमची कोणत्याही प्रकारची डिजिटल फसवणूक झाली, तर वेळ न घालवता तातडीने '1930' या क्रमांकावर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवा.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number