बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्नब’ चक्रीवादळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये धोक्याची घंटा वाजली आहे. सध्या हे कमी दाबाचे क्षेत्र वेगाने पुढे सरकत असून, रविवारपर्यंत त्याचे ‘डीप डिप्रेशन’मध्ये आणि सोमवारपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, 28 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत हे अति तीव्र चक्रीवादळ उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचेल. या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने तातडीने कडक पावले उचलत बाधित जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
वाऱ्याचा प्रचंड वेग आणि पावसाचा इशारा
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील काकीनाडाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर थेट धडकू शकते. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 115 ते 125 किमी राहण्याची शक्यता असून, काही क्षणांत हे झोत ताशी 140 किमीचा टप्पा ओलांडू शकतात. तसेच, त्याच रात्री हे वादळ श्रीकाकुलमच्या किनारपट्टीवरही धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे समुद्रात मोठी खळबळ उडाली असून केंद्रस्थानी वातावरणाचा दाब 972 ते 975 मिलिबार नोंदवला गेला आहे. किनारपट्टीवर प्रचंड लाटा उसळण्याचा अंदाज असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त सल्ला देण्यात आला आहे.
ओडिशातील 5 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट
चक्रीवादळाच्या तीव्रतेचा थेट परिणाम ओडिशामध्ये 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे. या काळात रायगडा, कोरापुट, गंजाम, गजपती आणि मलकानगिरी या दक्षिण आणि किनारपट्टीवरील पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवून ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येथे ताशी 60 ते 70 किमी वेगाने वादळी वारे वाहू शकतात. 29 ऑक्टोबर रोजीही पश्चिम आणि उत्तर ओडिशामध्ये पावसाचा जोर कायम राहील. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारने एनडीआरएफ (NDRF) ची 17 पथके, ओड्राफ (ODRAF) ची 60 पथके आणि अग्निशमन दलाची 225 पथके तैनात केली आहेत.
मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्याकडून सज्जतेचा आढावा
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी शनिवारी ‘लोक सेवा भवन’ येथे उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्याच्या सज्जतेचा सखोल आढावा घेतला. ‘दाना’ आणि ‘अम्फान’ यांसारख्या चक्रीवादळांचा सामना करण्याचा ओडिशाला मोठा अनुभव असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला पूर्ण सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. बाधित भागातील नागरिकांना, विशेषतः गर्भवती महिला आणि रुग्णांना सुरक्षित स्थळी व चक्रीवादळ निवारण केंद्रांमध्ये हलवण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा आणि मदत पथके 24 तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.