बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांत चक्रीवादळ ‘Senyar’ मध्ये परिवर्तित होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (Indian Metrological Department, IMD) वर्तवली आहे. या प्रणालीमुळे अंदमान समुद्रात लाटांची उंची वाढणार असून, किनारी भागांत जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या हे हवामान प्रणाली पश्चिम उत्तर पश्चिम (west northwest) दिशेने सरकत आहे. पुढील काही दिवसांत तामिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala), अंदमान आणि निकोबार बेट (Andaman and Nicobar Islands) तसेच इतर दक्षिणेकडील राज्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता IMD ने व्यक्त केली आहे.
समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचा, आवश्यक साहित्य साठवून ठेवण्याचा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार बेट (Andaman and Nicobar Islands) येथे 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या दरम्यान म्हणजे मंगळवार ते शनिवार या काळात मुसळधार ते अति-मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच तामिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala), माहे (Mahe), लक्षद्वीप (Lakshadweep), किनारी आंध्र प्रदेश (Coastal Andhra Pradesh) आणि यानम (Yanam) या भागांतही जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ओडिशा (Odisha) मधील काही किनारी जिल्ह्यांमध्येही 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत पावसाची शक्यता आहे. हा पाऊस स्ट्रेट ऑफ मलक्का आणि दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या तीव्रतेनुसार ठरेल, असे हवामान खात्याने सांगितले.
IMD चे वैज्ञानिक संजीव द्विवेदी यांनी सांगितले की हवामान प्रणाली पश्चिम-उत्तर (west-northwest) दिशेने पुढे सरकणार आहे. तसेच ही प्रणाली 26 नोव्हेंबर रोजी चक्रीवादळ Senyar मध्ये परिवर्तित होण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिरातीने (United Arab Emirates, UAE) या वादळाचे नाव ‘Senyar’ दिले आहे. या नावाचा अर्थ ‘सिंह’ असा होतो आणि हे नाव उत्तर हिंद महासागरातील वादळांच्या यादीत उल्लेख केले गेले आहे.