Thursday, March 12, 2026 11:12:25 PM

Youth Congress Protest: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या फोटोंसह घोषणाबाजी; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

या घटनेनंतर दिल्ली-एनसीआर परिसरात पोलिसांकडून छापेमारी मोहीम राबवण्यात येत आहे.

youth congress protest एआय इम्पॅक्ट समिटमध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या फोटोंसह घोषणाबाजी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या ‘एआय इम्पॅक्ट समिट’ दरम्यान झालेल्या आंदोलनप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत भारतीय युवा काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तसेच तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणात गैरजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या इतर काही कार्यकर्त्यांचा शोध सुरू असून ते सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेनंतर दिल्ली-एनसीआर परिसरात पोलिसांकडून छापेमारी मोहीम राबवण्यात येत आहे. समिट स्थळावरून पसार झालेल्या सात आंदोलनकर्त्यांचा माग काढण्यासाठी सुमारे 15 व्हिडिओ क्लिप्सच्या आधारे त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आंदोलनकर्ते कार्यक्रमस्थळी कसे पोहोचले, त्यांनी नोंदणी कशी केली, टी-शर्ट कुठे छापण्यात आले तसेच आंदोलनाचे नियोजन कोणी केले, यासह विविध मुद्द्यांवर सखोल तपास सुरू आहे.

नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आंदोलनकर्त्यांवर गुन्हेगारी कट रचणे, शासकीय कर्मचाऱ्याला दुखापत करणे, सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे तसेच सामूहिक हेतूने कायदा भंग करणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. आंदोलनादरम्यान सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांशी धक्काबुक्की झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा: Cashless Toll Plaza: टोल नाक्यांवर 'कॅश'ला कायमचा रामराम?; 'या' तारखेपासून सुरू होतेय नवी डिजिटल क्रांती

अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची ओळख बिहारमधील युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कृष्णा हरी, राज्य सचिव कुंदन यादव, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार आणि तेलंगणातील नरसिम्हा यादव अशी करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांची संसद मार्ग पोलिस ठाण्यात चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्लीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेश महला यांनी सांगितले की, सुमारे 15 जणांनी हॉल क्रमांक पाचमधील लॉबी परिसरात प्रवेश करून शर्टखाली परिधान केलेले टी-शर्ट प्रदर्शित करत अचानक आंदोलन सुरू केले. काही आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या छायाचित्रांसह घोषणाबाजी केल्याचेही समोर आले आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आंदोलनकर्त्यांनी कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी क्यूआर कोड नोंदणीचा वापर केला होता. सुरुवातीला काळ्या छत्र्यांवर स्टिकर लावून आंदोलन करण्याची योजना होती, मात्र सुरक्षा तपासणीदरम्यान अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ती योजना बदलण्यात आली आणि टी-शर्टवर घोषवाक्ये छापण्यात आली. सध्या फरार आरोपींचे मोबाईल फोन बंद असून तांत्रिक देखरेखीच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेता नाहीच? राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदे रिक्त


सम्बन्धित सामग्री