Friday, April 25, 2025 11:45:23 PM

Delhi Election Result : 'आप'चं गणित कुठे चुकलं की काय? काय असू शकतात मागे पडण्याची कारणं?

Delhi Election Result: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, दिल्ली निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.

delhi election result  आपचं गणित कुठे चुकलं की काय काय असू शकतात मागे पडण्याची कारणं

Delhi Election Result 2025: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, दिल्ली निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. 2013, 2015 आणि 2020 मध्ये निवडणुका जिंकणारे अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (आप) मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. एक मोठा प्रश्न असा उद्भवतो की दशकभर सत्तेत राहिल्यानंतर 'आप' मागे पडण्याची कारणे कोणती असू शकतात?

अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलीन
2012 मध्ये अण्णा हजारे यांनी जनलोकपालसाठी केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनातून उदयास आलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या स्वच्छ प्रतिमेला या निवडणुकीत धक्का बसला. दारू धोरण घोटाळा, त्यांच्या निवासस्थानाबाबत शीशमहाल प्रकरण आणि तुरुंगात पाठवल्यानंतरही राजीनामा न देण्याचा त्यांचा आग्रह यामुळे त्यांची प्रामाणिक प्रतिमा मलिन झाली.

सत्ताविरोधी लाट
10 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर, 'आप'ला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला. मोफत भेटवस्तू वाटण्याच्या सर्व घोषणा असूनही, 'आप'बद्दल लोकांचा असंतोष वाढला होता. 'आप' बद्दल लोकांमध्ये सत्ताविरोधी भावना होती.

खिरापत वाटण्याची संस्कृती
गेल्या 10 वर्षांत, 'आप'ने मोफत वीज, मोफत पाणी इत्यादी अनेक घोषणांसह आपल्या बाजूने वातावरण निर्माण केले. यावेळी भाजपच्याही हे लक्षात आलं की घोषणांमुळे फायदा होऊ शकतो. मग भाजपनेही वारेमाप घोषणांचं सत्र सुरू केलं. दुसरीकडे, 'आप' 10 वर्षे सत्तेत होता आणि सरकारविरोधी भावना लोकांमध्ये तयार झाली होती. दरम्यान, आप आणि भाजपचे जाहीरनामे पाहिल्यानंतर लोकांना भाजप हा एक मजबूत पर्याय वाटला असण्याची पूर्ण शक्यता आहे.

हेही वाचा - जेलची हवा खाणाऱ्या दिल्लीतील 'त्या' उमेदवारांची काय आहे स्थिती? जनतेने नाकारलं की, स्विकारलं? जाणून घ्या

भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याऐवजी तडजोडीचे धोरण 
अण्णांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या चळवळीतून 'आप'चा जन्म झाला आणि हेच त्याचे राजकीय भांडवल होते, परंतु अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांसारख्या वरिष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर पक्षाची प्रतिमा मलिन झाली. लोकांना दिलेली आश्वासने मोडल्याचा आणि जनलोकपाल सारख्या भ्रष्टाचारविरोधी विधेयकांची अंमलबजावणी न केल्याचा आरोपही पक्षावर करण्यात आला. यामुळे विश्वासार्हतेचे संकट निर्माण झाले. यामुळे लोकांमध्ये अशी भावना निर्माण झाली की, 'आप'ने त्यांचे मुख्य मुद्दे दुर्लक्षित केले आहेत आणि ते फक्त सत्तेच्या राजकारणात गुंतले आहेत.

शीला दीक्षित मॉडेल
शीला दीक्षित यांनी त्यांच्या कार्यकाळात दिल्लीला ज्या पद्धतीने चमकवले ते आजही लोकांच्या मनात ताजे आहे. त्या वेळेस काँग्रेस फारशी कुठेही चर्चा नव्हती. शीला दीक्षित यांच्या विकास मॉडेलची संपूर्ण निवडणुकीत चर्चा झाली. याचे कारण असे की, दशकभर सत्तेत असूनही, 'आप' बद्दल असे म्हटले जात होते की, या पक्षाने फक्त खिरापत वाटण्यावरच भर दिला आहे आणि दिल्ली विकासाच्या बाबतीत मागे राहिली.

हेही वाचा - दिल्लीत सत्ता कोणाची? अखेर कोण राखणार राजधानीचे तख्त? आज समजणार दिल्लीकरांचा कौल

काँग्रेसने खेळ बिघडवला
मुस्लिम बहुल भागातही 'आप'ला पराभव पत्करावा लागला आहे आणि भाजपने तिथून आघाडी घेतली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निवडणुकीत काँग्रेससोबत युती करण्यास 'आप'ने नकार देणे हे पराभवाचे एक मोठे कारण मानले जात आहे. कारण काँग्रेस पक्ष एकटा जिंकू शकत नाही. मात्र, वेगवेगळे लढल्यामुळे त्यांच्यासोबत मतांचं विभाजन होऊन 'आप'चा पराभव होण्याइतपत क्षमता काँग्रेसमध्ये नक्कीच आहे. कारण आप आणि काँग्रेस दोघांचेही मतदार साधारणपणे सारखेच आहेत. दुसरे म्हणजे, ओवेसींच्या एआयएमआयएमच्या प्रवेशामुळे मुस्लिम भागात 'आप'चा खेळ खराब झाला.

'आप'मध्ये पक्षांतर्गत नेत्यांची नाराजी आणि फूट
सत्ताविरोधी लाट रोखण्यासाठी पक्षाने अनेक आमदारांची तिकिटे रद्द केली. त्यामुळे पक्षात असंतोष निर्माण झाला आणि निवडणुकीच्या अगदी आधी ज्या सात विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात आली होती, त्यांनी 'आप' सोडले आणि भाजपला पाठिंबा जाहीर केला.


सम्बन्धित सामग्री