Delhi Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे सुरक्षायंत्रणांच्या हातात धक्कादायक पुरावे लागत आहेत. या हल्ल्याचा संपूर्ण पॅटर्न आधी वाटत होता त्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचा असल्याचे तपास पथकाला आता स्पष्ट होत आहे. स्फोटाच्या ठिकाणी आढळलेल्या पुराव्यांमुळे तपासाला नवी दिशा मिळाली असून, हल्लेखोराने वापरलेली पद्धत अत्यंत नियोजनबद्ध आणि गुप्त स्वरूपाची असल्याचे दिसत आहे.
प्राथमिक पाहणीत स्फोटस्थळी एका कारमधून सापडलेला बूट हा तपासाचा निर्णायक भाग ठरला. या बुटामध्ये धातूचा घटक लपवलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तज्ञांच्या मते, हा बूट ‘ट्रिगर डिव्हाइस’ म्हणून वापरला गेला असावा. कारच्या ड्रायव्हर सीटखाली तो सापडल्यामुळे स्फोटाची सुरुवात नेमकी कुठून झाली, याचे तंतोतंत आकलन तपास पथकाला मिळू लागले आहे. अशा प्रकारे पायात घालण्याच्या वस्तूमध्ये स्फोटक पुरवणे ही पद्धत याआधी आंतरराष्ट्रीय दहशतवादात पाहायला मिळाली होती. त्यामुळे या हल्ल्यामागचा दहशतवादी नेटवर्क किती प्रशिक्षित आणि अनुभवी आहे याची कल्पना येते.
तपास कार्यालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, हल्ल्यात TATP या धोकादायक स्फोटकाचा वापर झाल्याची शक्यता आता अधिक बळावली आहे. हे स्फोटक अत्यंत संवेदनशील असून अगदी हलक्या धक्क्याने किंवा उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतरही मोठा स्फोट घडवू शकते. TATP ची सर्वात मोठी समस्या म्हणजे ते सहजपणे ओळखता येत नाही, त्याला वास नसतो, रंग नसतो, आणि ते दिसायला स्फटिकासारखं साधं वाटतं. त्यामुळे अशा पद्धतीने ते शू बॉम्बमध्ये वापरणं दहशतवादी घटकांसाठी सोयीचं ठरतं.
हल्लेखोराच्या कनेक्शनबद्दलही काही महत्वाच्या कड्या समोर आल्या आहेत. दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेल्या काही डिजिटल ट्रेस तपासात मिळाल्याचे वृत्त आहे. मात्र सुरक्षेसाठी अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तपास अधिकारी मात्र या संपूर्ण प्रकरणातील एकत्रित पुरावे पाहता हा हल्ला एका एकट्या व्यक्तीचा नसून संगठित गटाच्या मदतीने नियोजनबद्ध झाल्याचा अंदाज वर्तवत आहेत.
दिल्लीसारख्या उच्चसुरक्षा क्षेत्रात अशा प्रकारचा हल्ला घडणे ही गंभीर बाब आहे. यानंतर देशभरातील सुरक्षा संस्थांना तपास अधिक काटेकोर करण्याची गरज भासत आहे. विमानतळे, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये शू स्कॅनर व बॉडी स्कॅनिंगची सुरक्षा वाढवण्याबाबतही चर्चा सुरू आहे. कारण TATP सारखी स्फोटके सामान्य निरीक्षणाने ओळखता येत नाहीत.
जनतेलाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद वस्तू, वाहन किंवा व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.
तपास अजूनही सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या उपलब्ध झालेल्या पुराव्यांमुळे हे स्पष्ट होत आहे की हा हल्ला तंत्रज्ञान आणि गुप्तयोजनेचा वापर करून अत्यंत कौशल्याने रचण्यात आला होता. देशाला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहेत.