नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा आगीच्या भीषण घटनेने हादरली आहे. शाहदरा येथील विवेक विहार परिसरात रविवारी पहाटे एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत किमान 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 4 ते 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे 3 वाजून 47 मिनिटांच्या सुमारास जेव्हा संपूर्ण परिसर गाढ झोपेत होता, तेव्हा बी-13 क्रमांकाच्या या इमारतीत आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीची सुरुवात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर झाली आणि काही वेळातच ज्वाळांनी संपूर्ण इमारतीला आपल्या विळख्यात घेतले. सुमारे अडीच तासांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या घटनेत आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Delhi: Fire breaks out in four-storey building in Shahdara, 3-4 bodies found, rescue op underway Read @ANI Story | https://t.co/0Yx703vowh #Fire #Shahdara #NewDelhi pic.twitter.com/5CUmZuDcST — ANI Digital (@ani_digital) May 3, 2026
या भीषण दुर्घटनेमागे एअर कंडिशनरमध्ये (AC) झालेला स्फोट कारणीभूत असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी वर्तवली आहे. ही चार मजली इमारत असून यामध्ये एकूण 8 फ्लॅट्स होते. आग लागली तेव्हा बहुतांश लोक गाढ झोपेत असल्याने त्यांना बाहेर निघण्याची संधीच मिळाली नाही. दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाने संयुक्त मोहीम राबवून सुमारे 14 ते 20 लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. आगीचे नेमके कारण काय आहे, याचा अधिकृत तपास अद्याप सुरू आहे.
सध्या इमारतीतील आग पूर्णपणे विझवण्यात आली असून ‘कूलिंग ऑपरेशन’ सुरू आहे. इमारतीच्या मागील बाजूच्या फ्लॅटमध्ये काही लोक अडकल्याची भीती सुरुवातीला व्यक्त केली जात होती, परंतु पोलिसांनी सध्या तरी आत कोणीही अडकले नसल्याचे स्पष्ट केले आहे. अग्निशमन दलाचे जवान आता संपूर्ण इमारतीची झडती घेत असून, कोणतीही कसर बाकी राहू नये याची खबरदारी घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ही इमारत अधिकृत होती का आणि तिथे आगीपासून बचावासाठी पुरेशी यंत्रणा होती का, याचीही पडताळणी केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या तापमानामुळे शॉर्ट सर्किट किंवा एसीवरील ताण वाढून अशा घटना घडण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या वेदनादायक घटनेने विवेक विहार परिसरात शोककळा पसरली आहे.