HC On Sonam Wangchuk: प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृती आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत. त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान, वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदान्ता या खाजगी रुग्णालयात हलवण्यास कोणतीही हरकत नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
उपचारांबाबत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचे स्पष्टीकरण
केंद्र सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, सोनम वांगचुक यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना मेदान्ता रुग्णालयात पाठवण्यास सरकारची तयारी आहे. मात्र, रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी कधी द्यायची, याचा अंतिम निर्णय तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतला जावा, अशी अट सरकारने ठेवली आहे. जंतरमंतरवर उपोषणाचा 21 वा दिवस असताना प्रकृती खालावल्याने त्यांना शनिवारी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपोषण मागे घेण्यास सोनम वांगचुक यांचा नकार; हस्तलिखित संदेश जारी
दुसऱ्या बाजूला, सफदरजंग रुग्णालयातूनच वांगचुक यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर एक हस्तलिखित पत्र शेअर करत उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आंदोलक तरुण नेत्यांना संसद भवनात जाऊन लोकप्रतिनिधींची भेट घेण्याची परवानगी मिळत नाही किंवा स्वतःला रुग्णालयात खासदारांना भेटू दिले जात नाही, तोपर्यंत अन्नत्याग न करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, आंदोलकांनी शांततेच्या मार्गानेच आपली मागणी मांडण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
Plea filed by Sonam Wangchuk’s wife, Dr Gitanjali Angmo, challenging Single Judge’s order refusing to shift him from Safdarjung Hospital to a private hospital of his choice | Delhi High Court – the Centre has no objection to shifting Sonam Wangchuk to Medanta Hospital, SG Tushar… — ANI (@ANI) July 21, 2026
उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाकडे लक्ष
सोनम वांगचुक यांना स्वतःच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात हलवण्याची मागणी आधी एकल न्यायाधीशांनी फेटाळली होती, ज्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सुनावणीवेळी वांगचुक यांचे डॉक्टर लांबा हेदेखील उपस्थित होते. सर्व बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सफदरजंग रुग्णालयातून सर्व वैद्यकीय कागदपत्रांसह त्यांना मेदान्ता येथे हलवण्याचा प्रस्ताव मांडला असून, या प्रकरणात दुपारी 2:30 वाजता वाजता अंतिम आदेश जारी केला जाईल.