नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने हवाई प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. इस्त्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अस्थिर बनली असून त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Indira Gandhi International Airport) प्रशासनाने प्रवाशांसाठी विशेष ‘पॅसेंजर ॲडव्हायजरी’ जाहीर केली आहे.
दिल्ली विमानतळ प्रशासनाने ही सूचना खबरदारीचा उपाय म्हणून जाहीर केली आहे. निवेदनानुसार, मध्यपूर्वेतील बदलत्या राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीमुळे पश्चिमेकडील आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर, विशेषतः युरोप आणि अमेरिकेकडे जाणाऱ्या फ्लाइट्सवर, परिणाम होऊ शकतो. काही उड्डाणांमध्ये विलंब, मार्ग बदल (Re-routing) किंवा वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा: Iran Israel War: मोठी बातमी! इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंचा इस्रायली हवाई हल्ल्यात मृत्यू; ट्रम्प यांचा दावा खरा ठरला
प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी संबंधित एअरलाइनकडून त्यांच्या फ्लाइटची अद्ययावत माहिती तपासून घ्यावी, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच रिअल-टाइम अपडेटसाठी अधिकृत संकेतस्थळ www.newdelhiairport.in
वर भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अपुष्ट अफवांपासून दूर राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
नागरी उड्डयन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की मध्यपूर्वेतील तणावामुळे काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे मार्ग प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून न जाता, शांतपणे अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवावा आणि प्रवासापूर्वी आवश्यक पडताळणी करावी.
ॲडव्हायजरीमध्ये प्रवाशांना संयम आणि सहकार्याची विनंती करण्यात आली आहे, जेणेकरून बदलत्या परिस्थितीतही विमानसेवा सुरक्षित आणि सुरळीतपणे सुरू ठेवता येईल. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार पुढील सूचना जारी केल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: Dubai Airport Attack: दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हादरले! इराण-इस्रायल वादाची ठिणगी युएईमध्ये? प्रशासनाने दिली मोठी माहिती