नवी दिल्ली: दिवाळीनंतर दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये हवेत मिसळलेलं प्रदूषण पुन्हा चिंतेचं कारण ठरलं आहे. काही दिवसांपूर्वी वाऱ्याच्या वेगामुळे हवामानात थोडी सुधारणा झाली होती, मात्र सोमवारपासून पुन्हा परिस्थिती बिघडली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कामकाजाच्या दिवशीच हवा इतकी खराब झाली की अनेक भागांमध्ये वायू गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) “गंभीर” श्रेणीत गेला. सोमवारी सकाळी दिल्लीच्या आनंद विहार भागात AQI 371 इतका नोंदवला गेला, जो अत्यंत खराब स्थिती दर्शवतो. चांदणी चौकात सकाळी 6.30 वाजता AQI 354 तर नरेला भागात 386 इतका होता. नोएडामध्ये AQI 311 पर्यंत पोहोचला, तर गाझियाबादमध्ये हवा तितकीच खराब होती. गुरुग्राममध्ये AQI 291 इतका नोंदला गेला, जो “खराब” श्रेणीत मोडतो. या आकडेवारीनं दाखवून दिलं की संपूर्ण दिल्ली-एनसीआर प्रदेश पुन्हा एकदा घातक प्रदूषणाच्या कचाट्यात सापडला आहे.
पंजाबमध्ये पराळी जाळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ
केंद्रीय संशोधन संस्था क्रीम्स (CREAMS) लॅबच्या सॅटेलाइट डेटानुसार, पंजाबमध्ये पराळी जाळण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान नोंदवलेल्या डेटात मोठी वाढ दिसून आली. दिल्ली-एनसीआरशी संबंधित सहा राज्यांमध्ये 15 सप्टेंबरपासून आतापर्यंत 4,000 पेक्षा जास्त पराळी जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. IARI (Indian Agricultural Research Institute) 3 नोव्हेंबर रोजी अद्ययावत माहिती जाहीर करणार आहे. तज्ज्ञांच्या मते, या पराळीच्या धुरामुळे दिल्लीतील हवेत सूक्ष्म धुलिकणांचं प्रमाण झपाट्यानं वाढलं आहे.
हेही वाचा: India Win World Cup 2025 : हरमनप्रीतच्या winning कॅचनं भारताचं स्वप्न साकार, महिला क्रिकेट संघानं कोरलं वर्ल्ड कप 2025 वर नाव
इतर राज्यांतील शहरांचीही हवा खराब
दिल्ली आणि तिच्या शेजारच्या भागांप्रमाणेच उत्तर भारतातील इतर शहरांची स्थितीही चिंताजनक आहे. लखनौ, मेरठ, बुलंदशहर, कानपूर, जयपूर आणि चंदीगडमध्ये PM 2.5 आणि PM 10 या घातक सूक्ष्मकणांचं प्रमाण अत्यंत वाढलं आहे. या कणांमुळे श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना गंभीर त्रास होऊ शकतो. ताज्या आकडेवारीनुसार लखनौ (गोमतीनगर) मध्ये AQI 225, मेरठमध्ये 374, बुलंदशहरमध्ये 267, कानपूरमध्ये 233, जयपूरमध्ये 209 आणि चंदीगडमध्ये 298 इतका नोंदवला गेला. तुलनेने भोपालमध्ये हवा सर्वात स्वच्छ असून तिथे AQI 81 इतकाच नोंदला गेला आहे.
प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात आरोग्य
तज्ज्ञांच्या मते, AQI 300 च्या वर गेल्यावर हवा “गंभीर” मानली जाते आणि ती आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरते. अशा हवेत श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव, आणि हृदयविकाराची शक्यता वाढते. तज्ज्ञांनी नागरिकांना सकाळी धावणे, सायकलिंग किंवा बाहेरील व्यायाम टाळण्याचा सल्ला दिला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरणं आणि घरात एअर प्युरीफायर लावणं हे सध्या सर्वोत्तम उपाय मानले जात आहेत.
सरकार आणि यंत्रणा सज्ज, पण आव्हान कायम
दिल्ली सरकार आणि केंद्राच्या संयुक्त यंत्रणांनी GRAP (Graded Response Action Plan) अंतर्गत काही उपाय सुरू केले आहेत. बांधकामांवर नियंत्रण, औद्योगिक धुरावर बंदी आणि वाहनांच्या चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. परंतु, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत पराळी जाळण्याचं प्रमाण कमी होत नाही आणि स्वच्छ वाहतूक धोरण लागू होत नाही, तोपर्यंत हवेची गुणवत्ता सुधारण्याची शक्यता कमी आहे.
नागरिकांमध्ये चिंता आणि अस्वस्थता
राजधानी आणि उपनगरांमध्ये लोकांना डोळे जळणे, घशात कोरडेपणा आणि श्वास घेण्यात अडचण अशी लक्षणं जाणवू लागली आहेत. शाळकरी मुलं आणि वृद्ध नागरिक विशेषतः त्रस्त झाले आहेत. अनेक पालकांनी शाळांमध्ये हवेची शुद्धता राखण्यासाठी विशेष उपाययोजनांची मागणी केली आहे. दिल्ली-एनसीआरचा हा हिवाळा पुन्हा एकदा “गॅस चेंबर” बनत चालला आहे. हवेतील घातक प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत आणि सरकारसमोर दीर्घकालीन पर्यावरणीय धोरण तयार करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
हेही वाचा: अमेरिकेचा वर्क व्हिसा किंवा ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी आता द्यावा लागणार DNA नमुना? ट्रम्प सरकारचा नवा प्रस्ताव चर्चेत