Monday, December 08, 2025 03:23:36 PM

Delhi Blast Update : लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर दिल्लीसह देशातील या शहरांमध्ये सुरक्षा वाढवली

लाल किल्ला परिसर, मेट्रो स्थानके, प्रमुख सरकारी कार्यालये तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI Airport) येथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

delhi blast update  लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर दिल्लीसह देशातील या शहरांमध्ये सुरक्षा वाढवली

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूच्या काही वाहनांना आग लागली आणि परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. स्फोटानंतर परिसर पूर्णपणे बंद करून तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात काही वाहनांजवळ संशयास्पद वस्तू सापडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सर्व शक्य दिशांनी तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर दिल्लीसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई, कोलकाता, हैदराबाद, डेहराडून, तसेच बिहार, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूतील काही संवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. स्फोटानंतर दिल्ली पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी पोहोचले. लाल किल्ला परिसर, मेट्रो स्थानके, प्रमुख सरकारी कार्यालये तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI Airport) येथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा: Major Blasts in India: भारताच्या सुरक्षेला हादरा देणाऱ्या स्फोटांची मालिका; कालानुक्रमाने जाणून घेवूयात

दरम्यान, हरियाणा सरकारने दिल्ली सीमेजवळील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या भागात आणि ऐतिहासिक स्थळांवर अधिक सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातही पोलिसांनी गस्त वाढवली असून नोएडा सीमेजवळ वाहनांची तपासणी सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

काल दिल्लीतील स्फोटाच्या या घटनेमुळे दिल्ली आणि आसपासच्या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तपास यंत्रणांकडून या घटनेचा मागोवा घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणाही या तपासात सहभागी झाली आहे. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: Delhi Blast Update: फरीदाबाद टेरर नेटवर्कचा धागा लाल किल्ला स्फोटाशी; काश्मीरमधील अटकेत असलेल्या 'त्या' दोन डॉक्टरांची चौकशी सुरू

 

सम्बन्धित सामग्री