विमानतळावर सेल्फी घेणे, रील्स बनवणे किंवा ट्रॅव्हल ब्लॉग शूट करणे आता महागात पडू शकते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सुरक्षा लक्षात घेऊन नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून, विमानतळ परिसरातील काही भागांत छायाचित्रण आणि व्हिडिओ शूटिंगवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार सुरक्षा तपासणी केंद्रे, बोर्डिंग गेट्स, रनवे परिसर, टॅक्सीवे, विमान हाताळणी क्षेत्र आणि इतर प्रतिबंधित झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असेल. या भागांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित प्रवाशाचा मोबाईल फोन जप्त केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे, गंभीर प्रकरणांमध्ये प्रवाशाचे नाव ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्येही समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे.
अलीकडच्या काळात विमानतळांवर सोशल मीडिया कंटेंट तयार करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक प्रवासी विमानतळावर पोहोचताच सेल्फी, रील्स किंवा लाइव्ह स्ट्रीमिंग करताना दिसतात. मात्र यामुळे विमानतळ सुरक्षा यंत्रणा, ऑपरेशनल प्रक्रिया आणि संवेदनशील माहिती नकळतपणे सार्वजनिक होण्याचा धोका निर्माण होतो, अशी चिंता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तथापि, सर्वच ठिकाणी फोटोग्राफीवर पूर्ण बंदी नाही. टर्मिनल परिसरातील सार्वजनिक भाग आणि लाउंजमध्ये मर्यादित प्रमाणात फोटो काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र कोणता भाग ‘सेफ’ आहे आणि कोणता ‘रेस्ट्रिक्टेड’ आहे, याबाबत प्रवाशांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
व्यावसायिक शूटिंग, जाहिरात चित्रीकरण किंवा इन्फ्लुएन्सर कंटेंट तयार करण्यासाठी आता विमानतळ प्रशासनाची पूर्वपरवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. परवानगीशिवाय शूटिंग केल्यास कायदेशीर कारवाई आणि दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. या नव्या नियमांमुळे काही प्रवासी नाराज झाले असले तरी, विमान वाहतुकीची सुरक्षा आणि शिस्त राखण्यासाठी हे निर्णय आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.