Medical College India: या कारणांमुळे राज्यासह देशातील वैद्यकीय महाविद्यालाये ईडीच्या रडारवर

ईडीने PMLA अंतर्गत देशभरातील 10 राज्यांतील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर छापे टाकत अभ्यासक्रम मंजुरीसाठी लाचवाटपाच्या मोठ्या साखळीचा उलगडा केला.

Medical College India: या कारणांमुळे राज्यासह देशातील वैद्यकीय महाविद्यालाये ईडीच्या रडारवर

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी महाराष्ट्रासह देशातील दहा राज्यांतील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर मोठी मोहीम राबवून छापे टाकले. विशिष्ट अभ्यासक्रमांना परवानगी मिळवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकारी आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) यांच्याकडे लाचवाटप झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. नियामक प्रक्रियेत जाणूनबुजून फेरफार करून कॉलेजला फायदा मिळवून देण्यात आल्याचा आरोपही समोर आला आहे. ही तपासणी PMLA (आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत हाती घेण्यात आली.

ईडीच्या पथकांनी संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांच्या सात इमारतींसह काही मध्यस्थांची आस्थापनेही झाडून तपासली. या संपूर्ण प्रकरणाचा धागा सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमधून सापडला होता, ज्यात भ्रष्टाचाराच्या प्राथमिक पुराव्यांचा उल्लेख आहे. तपासातून असे निष्पन्न झाले की काही कॉलेजांनी सरकारी परीक्षणातील गोपनीय माहिती मिळवण्यासाठी मध्यस्थांच्या साखळीचा वापर केला. सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच देऊन मिळालेल्या या माहितीचा फायदा घेऊन निरीक्षणातील त्रुटी लपवण्यात आल्या आणि अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या अटींमध्ये फेरबदल करण्यात मदत झाली, असा ईडीचा आरोप आहे.

हेही वाचा: SEBI : गुंतवणूक सल्लागार सेबीच्या रडारवर, 68 जणांची नोंदणी रद्द, जाणून घ्या नेमकं काय झालं?

सीबीआयच्या एफआयआरमध्ये 34 आरोपींची नावे नमूद आहेत यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आठ अधिकारी, NMC चे पाच अधिकारी आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. या प्रकरणी NMC मधील तीन डॉक्टरांसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून, छत्तीसगडमधील एका कॉलेजकडून 55 लाखांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.

या छापेमारीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील काही अधिकारी, NMC कर्मचारी, काही दलाल आणि काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेले जाळे उघडकीस आले. अधिकृत तपासणी प्रक्रियेचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी नियमांशी छेडछाड करण्यात आल्याचे गंभीर आरोप तपास यंत्रणांनी मांडले. ही कारवाई महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांत पार पडली. अनेक ठिकाणांहून कागदपत्रे, डिजिटल माहिती आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

तपास अधिक खोलात जाईल अशी शक्यता आहे. ईडी आणि सीबीआय संयुक्तरीत्या या भ्रष्ट साखळीमागील आणखी घटक शोधण्याचा प्रयत्न करत असून, येत्या काळात आणखी काही नावे समोर येऊ शकतात, असा अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Bangladeshi Infiltrators: राज्यातील बेकायदेशीर बांगलादेशी आणि घुसखोरांच्या अडचणी वाढणार; फडणवीस सरकारने घेतला 'हा' कठोर निर्णय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number