Pinarayi Vijayan ED Raid: केरळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी अचानक छापा टाकला. या कारवाईमुळे विजयन यांच्या समर्थकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आणि पाहता पाहता घटनास्थळी प्रचंड गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ED ची शोधमोहीम सुरू असतानाच सत्ताधारी पक्षाचे (CPM) कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने निवासस्थानाबाहेर जमा झाले. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. संतप्त कार्यकर्त्यांनी घरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला, तसेच तैनात अधिकाऱ्यांच्या दिशेने बाटल्या आणि हेल्मेट्स भिरकावले. या हिंसक उद्रेकादरम्यान आंदोलकांनी ED अधिकाऱ्यांवर थेट हल्ला केला आणि त्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करत दगडफेकही केली.
ED पथक न्यायालयात दाद मागणार
या अभूतपूर्व हल्ल्यानंतर तपास यंत्रणेने आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केरळमध्ये शासकीय कर्तव्य बजावत असताना आपल्या पथकावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी ED गंभीर दखल घेत असून, स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्याच्या तयारीत आहे. याव्यतिरिक्त, केंद्रीय तपास यंत्रणेच्या कामात अडथळा आणणे आणि वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी ED न्यायालयातही दाद मागण्याची शक्यता आहे. सुदैवाने, या संपूर्ण दगडफेक आणि तोडफोडीच्या घटनेत ED चा कोणताही अधिकारी जखमी झालेला नाही, मात्र यंत्रणेच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
CMRL कंपनी आणि कोट्यवधींच्या मनी लाँडरिंगचा संशय
हा संपूर्ण वाद केरळमधील 'CMRL' (कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड) या कंपनीशी संबंधित असलेल्या एका मोठ्या 'मनी लाँडरिंग' प्रकरणाशी जोडलेला आहे. कंपनीमध्ये बनावट खर्चाच्या नोंदी दाखवून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसेसणूक करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणात माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची कन्या वीणा विजयन यांचे नाव समोर आले आहे. या अनुषंगाने ED ने केरळमधील कन्नूर, एर्नाकुलम, तिरुवनंतपुरम आणि बंगळुरू येथील ठिकाणांसह एकूण सुमारे 10 ठिकाणी एकाच वेळी झडती सत्र सुरू केले. हे प्रकरण सर्वप्रथम 2019 मध्ये आयकर विभागाच्या छाप्यानंतर उघडकीस आले होते, ज्यात 130 कोटी रुपयांचे बनावट खर्च आढळले होते. त्यानंतर 'गंभीर फसवणूक तपास कार्यालयाने' (SFIO) केलेल्या तपासात हा आकडा तब्बल 182 कोटी रुपयांवर गेल्याचा दावा करण्यात आला. तसेच कंपनीने भागधारकांना कोणताही लाभांश न देता, व्यवस्थापकीय संचालकांना 30.63 कोटी रुपये मोजल्याचेही तपासात समोर आले आहे.
वीणा विजयन यांच्या कंपनीवर संशयाची सुई
ED च्या दाव्यानुसार, वीणा विजयन यांच्या 'एक्झालॉजिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला CMRL कडून 'आयटी सल्लागार सेवां'च्या नावाखाली सुमारे 2.78 कोटी रुपये प्राप्त झाले होते. याशिवाय, CMRL शी संबंधित दुसऱ्या एका कंपनीने एक्झालॉजिकला 50 लाख रुपयांचे संशयास्पद कर्ज दिले होते. CMRL कंपनीने या ED तपासाला केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र नुकताच 26 May 2026 रोजी उच्च न्यायालयाने कंपनीची याचिका फेटाळून लावत ED चा तपास कायदेशीररीत्या योग्य असल्याचा निर्वाळा दिला. न्यायालयाचा हिरवा कंदील मिळताच ED ने ही मोठी शोधमोहीम हाती घेतली. ज्यावेळी वीणा विजयन यांच्या निवासस्थानी ही कारवाई सुरू होती, तेव्हा त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन हे देखील तिथे उपस्थित होते. या कारवाईदरम्यान पथकाने बँक मुदत ठेवी (FDs) आणि महत्त्वाच्या गुंतवणुकीची कागदपत्रे जप्त केली असून, त्यांची सखोल छाननी केली जात आहे.