देशभरात अपघातांच्या घटनांनी चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून आजचा दिवस अत्यंत घातकी ठरल्याचं चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये काही तासांच्या अंतराने भीषण दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील एका गावमधील आठ जण नदीत शिंपले गोळा करण्यासाठी म्हणून गेले आणि तिथेच त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील एका नदीमध्ये 8 जण शिंपले गोळा करण्यासाठी नदीत उतरले होते. शिंपले गोळा करण्याच्या मोहात ते हळूहळू खोल पाण्याच्या दिशेने जाऊ लागले. त्याचवेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे सर्वजण एकापाठोपाठ एक वाहून गेले. यावेळी सुरुवातीला 2 ते 3 जण वाहून गेले. त्यानंतर इतरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या प्रयत्नात तेही वाहून गेले. मृतांमध्ये सात महिलांचा समावेश आहे. तसेच दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेने संबंधीत मृतांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी देखील या दुर्घटनेनंतर मृत पावलेल्यांप्रति शोक व्यक्त केला आहे.